या नेत्याच्या मुलाचे अपहरण, दहा कोटींची खंडणी

0

शिरुरचे आमदार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार अशोक पवार (Ashok Pawar)यांचा मुलगा ऋषीराज याचे अपहरण करुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अशोक पवार यांची मुलगी आम्रपाली आणि वकील असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ऋषीराज पवार शनिवारी दुपारी प्रचारात व्यस्त होता. अशोक पवार यांचा कार्यकर्ता भाऊ कोळपे याने छोटी बैठक घ्यायची असल्याचे सांगितले. कोळपे याच्यावर विश्वास ठेऊन ऋषीराज मांडवगण फराटा परिसरात गेला. तेथे त्याला कोळपे आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन कार्यकर्त्यांनी एका खोलीत नेले. त्यांनी त्याचे हातपाय बांधले. त्याला विवस्त्र केले. एका महिलेला खोलीत बोलावून अश्लील कृत्य करण्यास सांगितले. मोबाइलवर चित्रीकरण करण्यात आले. त्याला डांबून ठेवले. असे करण्यासाठी पुण्यातील एकाने दहा कोटी रुपये दिल्याचे कोळपे याने सांगितले. त्यानंतर ऋषीराज याने कोळपे आणि साथीदारांना जास्त पैसे देण्याचे आमिष दाखविले, असे ॲड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.