
अमरावती (Amrawati) : खोदकामात सोन्याचा हंडा सापडल्याची खोटी कहाणी सांगून दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला फसवले. अमरावतीतील एक भाजी विक्रेता सोन्याच्या माळांच्या प्रलोभनात सापडून ३ लाख रुपयांनी फसवला गेला.
घटनेनुसार, अमरावतीतील नांदगाव, खंडेश्वर येथील शुभांगी आणि सुरेश गुल्हाने या दाम्पत्याला २३ जुलै रोजी रात्री दोन अज्ञात व्यक्ती भेटल्या. या व्यक्तींनी राजापेठ येथील खोदकामात सोन्याचा हंडा सापडल्याचे सांगितले. हा हंडा विकायचा असल्याचे सांगून त्यांनी सुरेश यांना काही सोन्याचे मणी दिले. सुरेश यांचा विश्वास संपादन करून त्यांनी सोन्याच्या माळा ५ ते ७ लाख रुपयांमध्ये विकण्याची तयारी दाखवली.
काही दिवसांनी नागपूर येथे जाऊन या माळा विकत घेण्याचा सौदा झाला. ३० जुलै रोजी नागपूर येथे एका ज्वेलर्सलगत असलेल्या हनुमान मंदिरात ३ लाख रुपयांमध्ये हा सौदा फायनल झाला. मात्र, नंतर या माळा नकली असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे अधिक तपास सुरू आहे.
















