‘खिसेकापू’ वक्तव्य, राहुल गांधी पुन्हा अडचणीत

0

नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यापायी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी पुन्हा अडचणीत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उद्योगपती गौतम अदानी यांना राहुल गांधींनी ‘खिसेकापू’ म्हटले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
२२ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सर्वोच्च सरकारी पदांवर असलेल्या व्यक्तींवर घृणास्पद आरोप करणारे भाषण केले होते. ज्यामध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना ‘खिसेकापू’ म्हटले होते. यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात राहुल गांधी यांच्यावर कारवाई तसेच राजकीय नेत्यांकडून गैरवर्तन रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने ही विधाने योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने निवडणूक आयोगाला चौकशी करण्याचे आदेश तसेच राहुल गांधी यांना नोटीसही बजावली आहे. राहुल गांधी यांच्याकडून कुठलेही उत्तर आलेले नाही. त्यामुळे आता न्यायालयाने निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.