

– खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या चौथा दिवस
नागपूर, 16 डिसेंबर : राम हे पृथ्वीला व मानवतेला पडलेले सर्वात मोठे, सुंदर व मनोहर स्वप्न आहे. राम स्वयं मार्ग आहे व गंतव्यही आहे. अयोध्येचे राम मंदिर म्हणजे राम चेतनेचा प्रारंभ आहे, असे उद्गार विश्व विख्यात कवी, तरुणाईचे प्रेरणास्त्रोत डॉ. कुमार विश्वास यांनी येथे काढले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व कलागुणांचा संगम असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या आज, चवथ्या दिवशी ‘अपने अपने राम’ अंतर्गत विवेचनपूर्व प्रवचन देताना ते बोलत होते. हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती
याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संस्कार भारतीच्या प्रमुख कांचन गडकरी, आ. मंजुळा गावित, आ. अमित गोरखे, हितवादचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र पुरोहित, पतंजलीचे प्रमुख यशपाल आर्य, उद्योगपती पदमेश गुप्ता आणि संजय गुप्ता आदी मान्यवरांच्या हस्ते प्रभू रामचंद्राची पूजा, पुष्पार्चन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ. कुमार विश्वास पुढे म्हणाले की, पर्यटकांना प्रेमाचे प्रतीक दाखविताना ताजमहाल एवजी रामसेतू दाखवावा किंवा बिहार येथे पहाडावर वृक्ष लावून मार्ग तयार करणारा मांझी दाखवावा.
त्यांनी राम जटायू यांच्यातील भावनिक संवादाला वर्तमान स्थितिशी जोडत मार्मिक उद्बोधन केले. वनवास दिला म्हणून द्वेष न करता, भरतासारखा भाऊ दिला म्हणून रामाने सदैव कैकयी मातेचे प्रेमाने आभार मानले. स्वधर्माची सापेक्ष व्याख्या म्हणजेच रामराज्य होय, असे कुमार विश्वास म्हणाले. प्रारंभी डॉ. कुमार विश्वास यांच्या चमुतील विरेन, नीरजा उपरेती, प्रियांश शहा यांनी सुमधुर भजन व रामधून सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर, कविता तिवारी, ऋचा सुगंध यांनी केले.
सांस्कृतिक वातावरण फुलवणारा महोत्सव – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री पदभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा पहिला जाहीर सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या मंचांवर झाला. सत्काराला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या व्यासपीठाने कलावंत व विचारवंतांची ओळख दिली आहे. मोठमोठ्या कलाकारांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळणे हे या महोत्सवाचे आकर्षण आहे. उदयोन्मुख कलाकारांनाही अभिव्यक्तीसाठी या मंचाने मोठा हात दिला आहे. सांस्कृतिक वातावरण फुलवणारा हा महोत्सव आता शहराचे अविभाज्य अंग झाला आहे.
अमिताभ बच्चन यांना यायची इच्छा – नितीन गडकरी
मनोरंजन, लोकप्रबोधन, लोकसंस्कार, सांस्कृतिक अभिरुची वाढवणे व कलासक्त संस्कारक्षम मन तयार करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनाही या महोत्सवात सहभागी होण्याची इच्छा असल्याचे , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रसंगी सांगितले.
शास्त्रीय व सुफी गीतांचा नजराणा
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या
चवथ्या दिवशी, प्रथम सत्रात नागपूरचे युवा कलाकार असलेल्या ‘सफर’ बँड तर्फे शास्त्रीय आणि सुफी गीतांचा नजराणा पेश करण्यात आला. ‘सफर’ अंतर्गत आयुष मानकर व चमुतर्फे सरस गीते सादर करण्यात आली. या युवा कलाकारांच्या कलाविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले. याप्रसंगी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयुष मानकर, वंश गोरटकर, सुशांत पाटील, आकाश, आदित्य, सौरभ आणि अबीर या गायक, वादकांचा सन्मान करण्यात आला.
********
खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, डॉ. दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, ऍड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांचे महोत्सवाच्या सफलतेसाठी सहकार्य लाभत आहे.
******
आज ‘ अभंग वारी ‘
मंगळवार, 16 रोजी 7 वाजता भक्तीचा जागर कार्यक्रमात हरिपाठ व सायंकाळी 6 वाजता खासदार सांस्कृतिक महोत्सवात विश्व वारकरी सेवा संस्था ( नागपूर ) प्रस्तुत ‘अभंग वारी’ हा कार्यक्रम होणार असून यात एकाच वेळी २००० वारकरी कलाकारांच्या माध्यमातून नाट्य नृत्य, संगीताद्वारे व टाळ मृदंगाच्या गजरात पंढरीचा महिमा, वारीची परंपरा, वारीचा दैदिप्यमान प्रस्थान सोहळा, संतांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास, वारीचा प्रवास, वारीतील संतांच्या भेटीचा अविस्मरणीय क्षण , अश्वाचे गोल रिंगण , टाळ मृदंगाच्या गजरात पावल्या , हमामा फुगडी धावा इत्यादी मैदानी खेळ , संतांचे पंढरपुरात होणारे आगमन , पंढरपुरात साजरा होणारा आषाढी पर्व काळ इत्यादी प्रस्तुत करणार १००० टाळकरी , ५० मृदंगवादक , ५० तबलावादक , २५० गायक , ५०० नाट्य कलाकार , घोडे , पालख्या , भालदार , चोपदार , पताकाधारी इत्यादी २००० वारकरी कलाकाराचा सहभाग राहील.