
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केला विश्वास
आ.मुनगंटीवार यांची केरळचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. के. आर. ज्योतिलाल यांच्यासोबत बैठक
तिरुअनंतपुरम – महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तिरुअनंतपुरम येथे केरळच्या लॉटरी मॉडेलचा सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीने भेट दिली. यावेळी केरळचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. के. आर. ज्योतिलाल यांच्यासोबत त्यांची महसूलवाढीच्या संधींबाबत व्यापक चर्चा झाली. ‘केरळची यशस्वी लॉटरी योजना महाराष्ट्राच्या अर्थकारणाला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास यावेळी राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
सचिवालयात पार पडलेल्या या बैठकीला आमदार श्री. रोहित पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी केरळ लॉटरीच्या उपसंचालक श्रीमती स्टेफिना रॉड्रिग्ज यांनी श्री. मुनगंटीवार यांचे स्वागत केले.
आ.सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले,ही योजना केवळ महसूलवाढीपुरती मर्यादित नाही, तर रोजगार निर्मिती आणि सामाजिक कल्याणाचा प्रभावी स्त्रोत ठरेल.
या चर्चेदरम्यान, लॉटरी योजनेतील पारदर्शकता, सामाजिक विश्वास, आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यावर विशेष भर देण्यात आला. केरळ मॉडेलमध्ये राज्यातील जनतेचा लॉटरी व्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे आणि हीच गोष्ट त्याच्या सातत्यपूर्ण यशामागील खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
या बैठकीदरम्यान केवळ लॉटरीच नव्हे तर केरळचे एकूण आर्थिक आरोग्य, मसाल्यांच्या व्यापाराचे महत्त्व आणि राज्याच्या ऐतिहासिक परंपरेचा आर्थिक विकासाशी असलेला संबंध या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.
















