
‘कथक अश्वमेध-2023’ आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी नोंदणी सुरू
** प्राथमिक फेरी नागपूर शहरात 4 व 5 नोव्हेंबर रोजी
(Vidarbh)विदर्भ, 10 ऑक्टोबर 2023
भारत सरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्रालय, निर्झर कला संस्थान, गुरु कुंदनलाल गंगाणी फाउंडेशन आणि गुरु साधना फाऊंडेशन यांच्या द्वारे ‘कथक अश्वमेध-2023’ या आंतरराष्ट्रीय कथक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा मुख्य उद्देश तरुण पिढीला त्यांच्या प्राचीन कला आणि संस्कृतीकडे आकर्षित करणे आणि कथक नृत्याला समृद्ध करून उपजीविकेचे साधन बनवण्यासाठी तरुणांना प्रेरित करणे हा आहे.
(Dr. Sadhana Nafde) डॉ. साधना नाफडे आणि (Pandit Kundanlal Gangani) पंडित कुंदनलाल गंगाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या स्पर्धेची विदर्भातील प्राथमिक फेरी नागपूर शहरात 4 व 5 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. नागपूरच्या आजूबाजूची सर्व शहरे आणि विदर्भातील कथक नृत्याचे विद्यार्थी व कलाकारांना दिल्लीत आपले कलाकौशल्य दाखवण्याची उत्तम संधी ही स्पर्धा घेऊन आली आहे. इच्छूकांना www.nirzar.org या संकेतस्थळावर स्पर्धेसाठी ऑनलाईन नोदणी करता येईल.
‘कथक अश्वमेध – 2023’ ची प्राथमिक फेरी भारतातील 40 शहरांमध्ये आयोजित केला जात आहे. या स्पर्धेचे दोन गट करण्यात आले असून पहिला गट 12 ते 25 वयोगटातील विद्यार्थांसाठी आहे तर दुसरा 26 ते 40 वयोगटातील कथक नृत्य कलाकारांसाठी आहे. प्राथमिक फेरीतून 140 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून त्यापैकी सर्वोत्कृष्ट 7 नर्तक (दोन्ही गटातील) महाअंतिम फेरीसाठी निवडले जातील. या 7 सर्वोत्कृष्ट कलाकारांना दिल्ली येथे होणा-या दिमाखदार महाअंतिम सोहळ्यात आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. महाअंतिम फेरीत दोन्ही विभागातील सर्वोत्कृष्ट तीन विजेते निवडले जाणार आहे. विजेत्यांना भरघोस पारितोषिके दिली जाणार आहेत. कथक नृत्य शिकणारे विद्यार्थी व कलाकारांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.