
भोपाळ- मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव पक्षाच्या चांगलाच जिव्हारी लागला असून त्याचा फटका प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांना बसण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसच्या मध्य प्रदेशातील नेतृत्वबदलाच्या दिशेने काँग्रेसने हालचाली सुरु केल्या असल्याची माहिती असून त्यांच्याऐवजी नव्या नेत्याचा शोध काँग्रेसकडून सुरु असल्याची माहिती आहे. (Congress to Replace Kamal Nath)
मध्य प्रदेशात सत्ताविरोधी लाट असल्याचे मानले जात असताना परिस्थिती बदलण्यात भाजपला यश आले व भाजपने मोठ्या बहुमताने आपली मध्य प्रदेशातील सत्ता कायम राखली. काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. कमलनाथ यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. यावेळी कमलनाथ यांना नवा प्रदेशाध्यक्ष शोधण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. दुसरीकडे कमलनाथ यांनी इंडिया आघाडीतील काही नेत्यांवर टीका केली होती. त्यामुळेही काँग्रेस पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे. कमलनाथ यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांच्यावर जागा वाटपावरुन टीका केली होती. हे दोन्ही नेते कमलनाथ यांच्यावर नाराज असून आगामी काळात ही नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसने मध्य प्रदेशात नेतृत्वबदलाचा निर्णय घेतला आहे.