

सर्वोच्च न्यायालयाने जामीन नकाररेली ज्योती जगताप हि ज्या प्रतिबंधित माओवादी संघटनेची कार्यकर्ती होती ती कबीर कला मंच म्हणजे नेमक काय ते जाणून घेवूया….. (urban naxal)
कबीर कला मंच संघटनेच्या सागर गोरखे, रमेश गायचोर व ज्योति जगताप या तीन कार्यकर्त्यांना एनआयएने नुकतीच अटक केली. या कबीर कला मंचाचे कार्यकर्ते समाजात सांगतात की, आम्ही समतेची गाणी गातो म्हणून आम्हाला अटक होते… वास्तविक, पुरोगामी महाराष्ट्रात फक्त हेच समतेची गाणी गातात का? वामनदादा कर्डक, नामदेव ढसाळ अशा अनेकांनी विद्रोही कविता केल्या, कवि व शाहीरांची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. मग तुम्हालाच का अटक होते ? याची खरी कारणं मात्र कला मंचवाले कधीच सांगणार नाहीत.
कबीर कला मंच संघटनेच्या सागर गोरखे, रमेश गायचोर व ज्योति जगताप या तीन कार्यकर्त्यांना एनआयएने नुकतीच अटक केली. यानिमित्त हे कबीर कला मंच म्हणजे किती विघातक प्रकरण आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचा या संघटनेवर आरोप आहे. याच माओवादी संघटनेच्या ध्येयधोरणांनुसार कबीर कला मंचच्या माध्यमातून ‘भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान’अंतर्गत ‘एल्गार परिषद’ आयोजित करण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.
गोरखे व गायचोरसह अन्य कबीर कला मंच कलाकारांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात २०१३ मध्ये प्रतिबंधित माओवादी चळवळीत सक्रिय असल्याच्या आरोपाखाली अटक झाली होती. नंतर ते जामीनावर बाहेर होते. कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांनी जंगलात जाऊन माओवादी प्रशिक्षण घेतल्याचा आरोप होता. शरण आलेल्या नक्षलवाद्यांनीसुद्धा हे कलाकार जंगलात आल्याचे सांगितले आहे. तसेच पुण्यात आयोजित माओवादी प्रशिक्षण शिबीरामध्येही हे आरोपी सहभागी झाले होते. या माओवादी प्रशिक्षण शिबिराबाबत पुरावे उपलब्ध असल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत लेखी दिली होती. आणखी महत्वाचे म्हणजे २०१४ साली युपीए सरकारने लोकसभेत माओवादी फ्रंट संघटनांची यादी जाहीर केली होती, त्या यादीतही कबीर कला मंचचे नाव आहे.
या ‘कला’ मंचाचे कार्यकर्ते स्वतःला ‘आंबेडकरी’ म्हणवून घेत असले तरी मुळात हे लोक आंबेडकरवादी नाहीत कारण हे ‘जय भीम – लाल सलाम’चा घोष करतात. आंबेडकरवादी विचार मानणारा कार्यकर्ता मात्र फक्त ‘जय भीम’ म्हणत असतो. ‘लाल सलाम’ ही फक्त घोषणा नाही तर त्यातून कम्युनिस्ट विचारसरणीसुद्धा अधोरेखित होत असते. कबीर कला मंचने गीतांची एक सीडी प्रसिद्ध केली आहे. ‘ही आमची गाणी, आमचा गुन्हा काय’ या नावाने. यात त्यांनी सुरवातीला विविध शाहीर आणि भारतीय महापुरुषांची नावे घेवून सोबत ‘मार्क्स – लेनिन -माओ’चादेखील उघड जयघोष केला आहे. हे कार्यकर्ते विद्रोहाच्या नावाखाली माओवादी विचार पसरवून समाजाची दिशाभूल करण्याचे काम करतात. भारतीय महापुरुषांचा मुखवटा लावून माओवादी जहाल विचार चलाखीने समाजात पसरवतात. शहरी भागातील वस्त्यांमध्ये, महाविद्यालय, वसतिगृहात जावून विद्रोही शाहीरी जलसा सादर करणे आणि त्यातून माओवादी विचारांचा प्रसार व संघटन वाढविणे अशी यांची कार्यपद्धती राहिली आहे.
पुण्यातील कासेवाडी वस्तीमध्ये यांनी असाच विद्रोही शाहीरी जलसा सादर केला व संतोष शेलार नावाचा युवक यांच्या संपर्कात आला आणि २०१० मध्ये तो गायब झाला. पुढे तो छत्तीसगढच्या जंगलात बंदी घातलेल्या सशस्त्र माओवादी संघटनेचा कमांडर म्हणून सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात माध्यमांनी संतोषच्या घरी जावून त्याच्या आई-वडील व भावाकडून माहिती घेतली. एका मराठी वृत्तपत्राच्या बातमीनुसार संतोष शेलारच्या आई सुशीला म्हणतात की, ‘कबीर कला मंच चा कार्यक्रम वस्तीत झाला नसता तर एवढं घडलंच नसतं!’ संतोषच्या भावाने तर मंचावर थेट आरोप करत रमेश गायचोरचे नावसुद्धा घेतले आहे. मात्र कला मंचवाले मात्र याविषयावर सोयीस्कर मौन बाळगतात.
या कबीर कला मंचाचे कार्यकर्ते समाजात सांगतात की, आम्ही समतेची गाणी गातो म्हणून आम्हाला अटक होते… वास्तविक, पुरोगामी महाराष्ट्रात फक्त हेच समतेची गाणी गातात का? वामनदादा कर्डक, नामदेव ढसाळ अशा अनेकांनी विद्रोही कविता केल्या, कवि व शाहीरांची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. मग तुम्हालाच का अटक होते? याची खरी कारणं मात्र कला मंचवाले कधीच सांगणार नाहीत. कार्ल मार्क्सच्या कम्युनिस्ट सिद्धांतानुसार ‘राज्य हे नेहमी जनतेचे शोषण करणारे असते..’ या सिद्धांतावर गाढ श्रद्धा ठेवून माओवादी फ्रंट संघटना अनेक सामाजिक घटना व समस्यांसाठी सरसकट राज्यव्यवस्थेला दोषी ठरवत असतात. सातत्याने शासनाविषयी व संविधानिक यंत्रणांविषयी शंका निर्माण करणे व समाजात असंतोष वाढविण्याचा प्रयत्न करणे हा यांच्या धोरणाचा भाग आहे.
भारतात ज्याने माओवादी चळवळीची सुरवात केली तो चारू मुजुमदार म्हणतो, “चीनचा चेअरमन तो आमचा चेअरमन” तसेच, रक्तरंजित क्रांतीद्वारे सत्ता मिळवणे हे यांचे ध्येय आहे. यानुसार यांनी भारतात हजारो पोलीस तसेच शेकडो दलित – आदिवासी बांधव व सामान्य नागरिकांच्या हत्या केल्या आहेत. अशा देशविरोधी चळवळीला शहरातील यांच्या अशा फ्रंट संघटना मदत करतात ही फार गंभीर बाब आहे. एल्गार परिषदेच्या तयारीनिमित्त यांनी २०१७ च्या वर्षात राज्यभर अत्यंत प्रक्षोभक असा प्रचार केला. ‘कोरेगाव-भीमाने दिलाय धडा अन नवी पेशवाई मसणात गाडा’ असा नारा देत यांनी वैचारिक विरोधकांसह संविधानिक यंत्रणावरही आरोप केले आणि त्यांना गाडण्याची चिथावणीखोर भाषा वापरली. याचं कारण म्हणजे, मुळात या माओवाद्यांचा लोकशाही, संविधानिक मार्गावर विश्वास नसल्याने असा अराजकी प्रचार हे करतात आणि त्यातून सामाजिक संघर्ष घडवून आणतात.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मिती करून सामाजिक परिवर्तनासाठीचा संविधानिक मार्ग दाखवला. आज अनेक संघटना, कार्यकर्ते संविधानाला अपेक्षित समाजनिर्मितीसाठी कार्यरत आहेत. परंतु, या संविधानिक मार्गाला न मानणारे कला मंचसारखे जहाल गट हे बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या अराजकी, हिंसक विचाराने काम करत आहेत. देशाच्या शत्रूसंघटनेच्या धोरणानुसार बेकायदेशीर व समाजविघातक कार्यात सक्रिय असल्याच्या कारणाने यांना अटक झाली आहे. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेता तपास यंत्रणांनी सखोल तपास करत शहरी भागांत पसरलेले यांचे माओवादी जाळे खोदून काढणे व या जहाल कॉम्रेडसवर अत्यंत कडक कारवाई होणे नितांत आवश्यक आहे.