
(Mumbai)मुंबई : महाराष्ट्रात राजकीय शक्ती निर्माण करण्याचे प्रयत्न तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून सुरु आहेत. चंद्रशेखर राव हे संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपुरला येणार असल्याची माहिती आहे. (K. Chandrashekar Rao) यावेळी हेलिकॉप्टरमधून वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. 300 गाड्यांच्या ताफ्याने हे मंत्रीमंडळ महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. “अबकी बार किसान सरकार” अशी घोषणा देत चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. बीआरएस पक्षाच्या गळाला महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते लागले आहेत. यातच महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढवण्यासाठी बीआरएसने वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठ्या महासोहळ्याची निवड केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, के चंद्रशेखर राव हे 27 जूनला पंढरपूरला येणार आहेत. मंदिरात जाऊन विठ्ठल दर्शनानंतर ते वारकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत. दुसऱ्या दिवशी (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महापुजेसाठी पंढरपूरला दाखल होणार आहेत. त्याच्या एक दिवश अगोदरच के. चंद्रशेखर राव हे पंढरपुरला दाखल होत आहेत. आषाढीपूर्वीच पुण्यापासून सर्व पालखी मार्गावर आणि पंढरपूर शहरात बीआरएसकडून जोरदार होर्डिंगबाजी करण्यात आली आहे.