
अर्ध्यावरच थांबली परिवर्तनची दौड
भाजपच्या दोन्ही महिला उमेदवार पराभूत
अमोल खोडे @ अमरावती : सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठित जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँकेवर पुन्हा जिजाऊ सहकार पॅनेलचा झेंडा फडकला. बँकेच्या एकूण १५ संचालक पदासाठी झालेल्या या निवडणुकीत जिजाऊ सहकार पॅनेलचे १० संचालक विजयी झाले. तर परिवर्तनाचा नारा देऊन मैदानात उतरलेल्या विरोधकांची दौड निम्म्यावरच थांबली. या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलला फक्त ५ जागा जिंकता आल्या.
जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या १५ संचालक पदासाठी रविवारी (ता.३१) घेण्यात आलेल्या निवडणुकीत ६८ टक्के मतदान झाले. बँकेच्या एकूण ६ हजार ६७६ मतदारांपैकी पैकी ४ हजार ६०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (ता.१) शहरातील सुयोग मंगल कार्यालयात या निवडणुकीची मतमोजणी झाली. उत्तरोत्तर प्रगती पथावर अग्रेसर असलेल्या जिजाऊ बँकेची धुरा आपल्याच हाती राहावी यासाठी बँकेचे दोन्ही आजी-माजी अध्यक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक मैदानात होते. त्यामुळे यावेळी सहकार कि परिवर्तन याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून होते. सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीचा पहिला निकाल सहकारचे भटक्या विमुक्त जाती-जमातीचे उमेदवार चाफले यांच्या बाजूने लागला. त्यांनी त्यांचे प्रतिद्वंदी वासुदेव जाधव यांचा पराभव केला. त्यांनतर टप्या-टप्य्याने अन्य प्रवर्गातील विजयी उमेदवारांच्या नावाची घोषणा होत गेली आणि जिजाऊ सहकार पॅनेलने सर्वाधिक १० जागा जिंकून जिजाऊ बँकेवरचा झेंडा कायम राखला.
भाजपच्या दोन्ही महिला उमेदवार पराभूत
जिजाऊ बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या किरण महल्ले या परिवर्तन पॅनलच्या वतीने तर सुरेखा लुंगारे या सहकार पॅनलच्या वतीने बँकेच्या महिला संचालक पदासाठी निवडणूक रिंगणात होत्या. परंतु या दोघींचाही या निवडणुकीत पराभव झाला. परंतु सहकार पॅनलच्या पल्लवी बारब्दे व परिवर्तन पॅनलच्या वैशाली गुडधे या दोन्ही पॅनलच्या १-१ महिला प्रतिनिधी संचालक म्हणून विजयी झाल्या आहेत.
विजयी उमेदवार (पॅनलनिहाय)
सहकार परिवर्तन
अविनाश कोठाळे प्रशांत गावंडे
नितीन डहाके राजेंद्र अढाऊ
अनिल बंड अरविंद गावंडे
गौरव विधळे अनिल टाले
बबन आवारे वैशाली गुडधे
श्रीकांत टेकाडे
प्रदीप चौधरी
पल्लवी बारब्दे
सुनील चाफले
स्वप्नील वावरे