

राष्ट्रयोगी श्री गोविंददेव गिरी महाराज दिला जाणार
नागपूर (nagpur), 10 ऑक्टोबर
छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर-पुणे दिला जाणारा ‘जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार’ राष्ट्रयोगी तपस्वी संत श्री गोविंददेव गिरी महाराज यांना जाहीर झाला असून पुरस्कार वितरण सोहळा रविवार, 13 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे सायंकाळी 6 वाजता होणार्या या कार्यक्रमात ज्ञानेशनंदिनी प्रतिष्ठान पाथर्डीचे अध्यक्ष प्रज्ञाचक्षु विद्याभूषण मुकुंदकाका जाटदेवळेकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजेय देशमुख राहणार असून धर्मभास्कर सद्गुरूदास महाराजांची विशेष उपस्थिती राहील. या कार्यक्रमात श्री गुरू मंदिर परिवाराचा पत्रभेटचा दिवाळी विशेषांक म्हणजेच ‘अष्टलक्ष्मी विशेषांक’चे प्रकाशन गोविंददेव गिरी महाराजांच्या हस्ते होणार आहे.
सुरेशभट सभागृहात जाण्याकरिता व वापस येण्याकरिता कार्यक्रमाचे दिवशी दुपारी 4 वाजता गुरू मंदिर, जयप्रकाशनगर येथून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे. या सोहळ्याला सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे सचिव भालचंद्र देशकर आणि विश्वस्त मंडळाने केले आहे.