‘जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार’ जाहीर

0

स्वामी गोविंददेव गिरी महाराजांना ‘जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार’ जाहीर
छत्रपती सेवा प्रत‍िष्‍ठानतर्फे 13 ऑक्‍टोबर रोजी सोहळा
नागपूर (nagpur), 30 सप्टेंबर
छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर-पुणे तर्फे यावर्षीचा 42 वा ‘जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार’ राष्ट्रयोगी तपस्‍वी संत श्री गोविंददेव गिरी महाराज यांना जाहीर झाला आहे. ज्ञानेशनंदिनी प्रतिष्ठान पाथर्डीचे अध्यक्ष प्रज्ञाचक्षु विद्याभूषण मुकुंदकाका जाटदेवळेकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार रविवार, 13 ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे सायंकाळी 6 वाजता होणार्‍या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजेय देशमुख राहणार आहेत , तर धर्मभास्कर सद्गुरूदास महाराजांची विशेष उपस्थिती राहणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351 व्या राज्याभिषेक वर्षी आणि छत्रपती सेवा प्रतिष्ठान च्या सुवर्ण महोत्सवी वर्षी ही सार्थ निवड करण्यात आली आहे.

51000 ₹ रोख, शाल, श्रीफळ, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरवर्षी धर्म, इतिहास, संस्कृती या क्षेत्रात व्रतस्थ कार्य करणाऱ्या महनीय विद्वान व्यक्तित्वाला पुरस्कृत केले जाते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सेतू माधवराव पगडी, गो. नी. उपाख्य आप्पासाहेब दांडेकर, डॉक्टर जयसिंगराव पवार, गो. ब. देगलूरकर सर, पंडित वसंतराव गाडगीळ, किसन महाराज साखरे, धुंडा महाराज देगलूरकर, नामदेव गाथाव्रती निकते गुरुजी, हृदयनाथ मंगेशकर, लतादीदी मंगेशकर, विद्या भूषण मुकुंद काका जाटदेवळेकर, गणेश्वर शास्त्री द्राविड इत्यादि अनेक थोर व्यक्तींनी हा पुरस्कार जिजाऊ साहेबांचा प्रसाद या पवित्र भावनेने स्वीकारला आहे.

श्री गोविंददेव गिरी महाराज हे अयोध्‍या येथील रामजन्‍मभूमी न्‍यासचे कोषाध्‍यक्ष असून मागील 50 वर्षांपासून श्रीमद्भागवत, रामायण, महाभारत आदी विषयावर प्रवचन करीत आहेत. मराठी, हिंदी, संस्‍कृत, इंग्रजी, मारवाडी आणि गुजराती भाषेवर प्रभुत्‍व असेलल्‍या गोविंदगिरी महाराजांची शंभराहून अधिक पुस्‍तके प्रकाशित आहेत. त्‍यांना संस्‍कृत साधना शिखर पुरस्‍कार, राष्‍ट्रगौरव पुरस्‍कार, संत ज्ञानोबा तुकोबा पुरस्‍कारांसह अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले आहे. 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षी हरिद्वार येथील पतंजली योग पीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्राचा मराठी व हिंदी भाषेत प्रसार करण्याचे कार्य आरंभ केले आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट चे कोषाष्यक्ष या नात्याने त्यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्माणात भरीव योगदान दिले आहे. गीता परिवार आणि संत ज्ञानेश्र्वर गुरुकुल यांच्या माध्यमातून व्यक्ती, कुटुंब, समाज जोडण्याचे शाश्वत धर्म कार्य ते करीत आहेत.

या सोहळ्याला सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे सचिव भालचंद्र देशकर आणि विश्वस्त मंडळाचे संजय बारहाते , प्रसन्न बारलिंगे ह्यांनी केले आहे.