

सेलू (Selu) :-काल सायंकाळी मंगळवार बाजार सेलू येथून बाजार घेऊन सुकळी येथे जात असलेल्या व्यक्तीच्या दुचाकीला जंगली डुक्कर आडवा आल्याने अपघात झाला व दुचाकी चालक गंभीर जखमी झाला.
ही घटना ता. 17 मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजता सेलू-सुकळी (स्टेशन) रोडवर जिनिंग जवळ घडली. प्रदीप हरिप्रसाद परते वय 24 रा. शिवणी, मध्यप्रदेश असे जखमीचे नाव असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार सुकळी स्टेशन येथे रेल्वेच्या कन्स्ट्रक्शन कामावर असलेले प्रदीप परते हे सेलू येथे बाजारासाठी आले होते.
बाजार घेऊन ते एमपी 22 एमएम 4331 क्रमांकाच्या दुचाकीने सेलू वरून सुकळी स्टेशन येथे जात होते. दरम्यान कापसाचे जिनिंग जवळ त्यांच्या दुचाकीला जंगली डुक्कर आडवा आल्याने दुचाकीला धडक लागून वाहनासह ते फेकल्या गेले. त्यात त्यांच्या पायाला जबर दुखापत होऊन गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे याने घटनास्थळी धाव घेत जखमीला आपल्या रुग्णवाहिकेतून सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर गंभीर दुखापत असल्याने सेवाग्राम रुग्णालयात रेफर करण्यात आले.