
(Nagpur)नागपूर, 20 मार्च
रस्ता सुरक्षेच्या क्षेत्रात कार्य करणा-या जनआक्रोश या सामाजिक संघटनेतर्फे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने बोरखेडी येथील डेपोमध्ये ज्वलनशील पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक करणा-या टँकर चालक व वाहकांना रस्ता सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण दिले.
जनआक्रोशच्या रस्ता सुरक्षा शिक्षण कार्यक्रमात सुमारे 50 टँकर चालक व वाहकांनी सहभाग नोंदवला. शिबिराला भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे लिमिटेडचे आगार प्रभारी देविदास पानझाडे, कल्पना हेडाऊ, मनीष कुमार यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते. जनआक्रोशचे अध्यक्ष प्रकाश खांडेकर, दत्तात्रेय कुलकर्णी आणि रमेश शहारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी, देविदास पानझाडे यांनी रस्ता सुरक्षा शिक्षणाच्या गरजेवर भर दिला आणि सहभागींना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.
पेट्रोल, डिझेल, रॉकेल इत्यादी धोकादायक ज्वलनशील पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक करण्यात टँकर चालकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यांच्यासमोर कठीण आव्हाने आणि जोखीम असते. त्यामुळे सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असे प्रकाश खांडेकर यांनी सांगितले. टँकर मध्ये ज्वलनशील पदार्थ भरताना सुरक्षित पद्धती अवलंबण्यास, किरकोळ विक्री केंद्रापर्यंत वाहतूक करताना, सुरक्षितपणे उतरवताना गळती किंवा अपघात कसे हाताळायचे यासारख्या आपत्कालीन परिस्थितीच्या तयारीबद्दल माहिती दिली. दुदैर्वी घटना झाल्यास तत्परतेने त्याची संबंधित विभागांना माहिती देऊन कम्युनिकेशन प्रोटोकॉलचे पालन केले जावे, असे त्यांनी सांगितले.
अपघात टाळण्यासाठी बचावात्मक ड्रायव्हिंग तंत्रांचा अवलंब करावा आणि वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व रस्त्यावर गाडी चालवताना स्वतःचे आणि इतर रहदारीचे तसेच जवळपासच्या परिसरातील रहिवाशांचे जीवन वाचवण्याला प्राधान्यक्रम द्यावा, असे प्रकाश खांडेकर म्हणाले.
















