खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ उपक्रम

0

संकष्‍टी चतुर्थीचे औचित्‍य साधून (खासदार सांस्कृतिक महोत्सव) अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ कार्यक्रमात अथर्वशीर्ष पठणाचे बुधवारी सकाळी हनुमान नगरच्या ईश्वर देशमुख शरारीक शिक्षण महाविद्यालयाच्या परिसरात आयो‍जन करण्‍यात आले होते. यावेळी हजारो गणेशभक्‍तांनी एका सुरात सादर केलेल्‍या ‘ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि ..’ वातावरण भारावून गेले. पहाटेचा प्रहर, मंगल ध्वनी, एकसुरातील अथर्वशीर्ष पठणाची 21 आवर्तने यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. तत्पूर्वी, कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन व श्रीगणेशाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली.

त्‍यांचे स्वागत व सत्कार संस्कार भारतीच्या प्रमुख कांचन गडकरी यांनी केला. देवी अहिल्याबाई स्मारक समितीच्या कार्यवाहिका सरिता राजुरकर, प्रांत प्रमुख नागपूर वसुधा खटी आणि मनीषा दुबे यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्यान प्रक्रिया समजावून सांगणाऱ्या देवयानी शिरखेडकर आणि अथर्वशीर्ष पठण करण्यामागची भूमिका आणि अर्थ स्पष्ट करणाऱ्या निराग कुळकर्णी यांचा सत्कार शांताक्का यांनी केला.

त्‍यांनी उपस्थितांना हिंदू संस्कृतीमध्ये असलेल्या सामूहिक श्लोक पठण आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे महत्व सांगितले. समाजात सकारात्मकता निर्माण होऊन समाज एकसंघ राहण्यास यामुळे मदत होते. याशिवाय, अश्या आयोजनातून सांघिक भावना प्रबळ होते आणि आपल्या संस्कृतीचा प्रचार होते, असे त्‍या म्‍हणाल्‍या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. खासदार सांस्‍कृतिक सम‍ितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, जागर भक्‍तीचाचे संयोजक डॉ. श्रीरंग व-हाडपांडे, विजय फडणवीस, अविनाश घुशे, माया हाडे, श्रद्धा पाठक इत्‍यादींची उपस्‍थ‍िती होती.