बुलढाण्यात बहुरंगी लढतीत जाधवांची कसोटी !

0

लोकसभा निवडणूक

नागपूर(Nagpur): ( शंखनाद चमू ) बुलढाणा मतदारसंघात 21 उमेदवार असून यावेळी पश्चिम विदर्भातील बहुरंगी लढत असणार आहे. बुलढाण्याची परंपरागत जागा शिवसेनेकडे कायम ठेवण्याचे आव्हान खा प्रतापराव जाधव यांच्यासमोर आहे. विदर्भातील तीन मतदारसंघापैकी रामटेक आणि यवतमाळ अशा दोन लोकसभा मतदारसंघात विद्यमान सेना खासदारांचे तिकीट कापण्यात आले असताना प्रतापराव जाधव नशीबवान ठरले, आता त्यांनी तिकीट तर आणले पण विजयश्री खेचून आणण्यात ते यशस्वी होतील का, हा खरा प्रश्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही यात कसोटी आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे प्रा नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवारी दाखल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर असे तुल्यबळ उमेदवारांनी या निवडणुकीत रंगत वाढविली आहे. अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्या उमेदवारीने ही निवडणूक चर्चेत आली. एकंदरीत घाटाखाली आणि घाटाच्या वर असे विभाजन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात सर्वसमावेशक, चौफेर सर्वाधिक मते कोण घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. आजघडीला या मतदारसंघात बहुरंगी व शेवटी चौरंगी लढत होणार असे दिसत आहे. प्रस्थापितांविरोधात मतविभाजनाचा धोका वाढलेला असताना खासदार प्रतापराव जाधव यांच्यासमोर आपली जागा कायम ठेवण्याचे आव्हान आहे. शेतकऱ्यांचे भक्कम पाठबळ असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याचवेळी महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडकर यांच्या निमित्ताने महाविकास आघाडीची मजबूत वज्रमूठ या निवडणुकीत काय कमाल दाखवते याकडे आता सामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.