“पवारांनीच भाजपसोबत जाण्यास सांगितले”, अजित पवारांचा गौप्यस्फोट

0

कर्जत-कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांबाबत गौप्यस्फोट केले. शरद पवार यांच्या धरसोड वृत्तीवर टीका करताना राजीनामा मागे घेण्यासाठी शरद पवारांच्या आदेशानेच आंदोलने सुरु होती, असे त्यांनी सांगितले. “भाजपसोबत सरकारमध्ये जा, मी राजीनामा देतो” असेही शरद पवार यांनी म्हटले होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. देवगिरी बंगल्यावरील त्या बैठकीला सुप्रिया सुळे व जयंत पाटील यांनाही बोलावल्याचा दावा अजित पवारांनी केला. शरद पवार यांनी आम्हाला गाफिल का ठेवले, असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

रायगडमधील कर्जत येथे पार पडलेल्या अधिवेशनात बोलताना अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर घडलेल्या घडामोडींवर भाष्य करताना अजित पवारांनी गौप्यस्फोट केले. अजित पवार यांनी सांगितले की, शरद पवारांकडून आम्हाला गाफील ठेवले जात होते. राजीनामा मागे घेण्यासाठी शरद पवारांच्या आदेशानेच आंदोलने सुरु होती. मी मागे जात नाही, पण यामध्ये प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि काही प्रमुखापासून सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत. आम्ही सात ते दहा दिवस थांबलो. जयंत पाटील आणि अनिल देशमुख होते. आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जाऊन भेटलो. वेळ जातोय एकदा काय ते निर्णय घ्या, असे सांगितले. १ मेचा दिवस होता व मला बोलावून सांगितले की सरकारमध्ये जावा मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. २ तारखेला कार्यक्रम होता, कुणाला काही माहिती नव्हते. घरातील चार जणांना राजीनाम्याबाबत माहिती होते. पंधरा जणांची समिती झाली. शरद पवार त्यानंतर घरी गेले. शरद पवारांनी आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाड यांना बोलावून घेतले. युवक आणि महिला आघाडीच्या लोकांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान बाहेर आंदोलन करायला सांगण्यात आले. तिथे काही जण आंदोलन करत होते. पण, जितेंद्र आव्हाड सोडले तर तिथे एकही आमदार नव्हता. राजीनामा मागे घेतला गेला व त्यानंतर सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा, असे सांगण्यात आले. जी धरसोड सुरु होती ती मला मान्य नव्हती. आम्ही २ जुलै रोजी शपथ घेतल्यानंतर तो निर्णय आवडला नव्हता तर १७ जुलैला का बोलावले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तुम्ही आम्हाला गाफील ठेवत होता का? एवढे सगळे झाल्यावर १२ ऑगस्टला रोजी मला एका उद्योगपतीने जेवायला बोलावले. तिथे जयंत पाटील, शरद पवार आणि मी असेन, असे त्या उद्योगपतीनं सांगितले. सुरळीत करायचे नव्हते तर कशा करता गाफील ठेवायचे, असा सवाल अजित पवार यांनी केला.