

– सद्गुरुदास महाराज यांचा हितोपदेश
– गुरुमंदिरचा गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात
नागपूर(Nagpur), 10 जुलै-मोक्षप्राप्तीची लालसा सर्वांनाच असते, पण ती प्राप्त करावयाची असल्यास योग्य गुरूच्या सत्संगातून ते शक्य आहे, असा हितोपदेश प. पू. सद्गुरुदास महाराज यांनी भाविकांना केला.
जयप्रकाश नगर येथील श्री गुरुमंदिरचा द्विदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव गुरुवारी सहकारनगर येथील गजानन मंदिरात उत्साहात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज बोलत होते.
ते म्हणाले, जो गुरू ज्ञानी आणि सांसारिकदृष्ट्या उदासीन असेल अशा गुरूची शिष्यांनी निवड करावी. ज्या प्रमाणे राजा आणि सत्तेसोबत राहिल्यास श्रीमंती आणि सत्ता राबविण्याचे सामर्थ्य प्राप्त होते, त्याचप्रमाणे योग्य गुरूंच्या सत्संगातून ज्ञान, वैराग्य मार्गे मोक्षप्राप्तीकडे जाणे शक्य होते, असे सांगितले.
भाविकांनी उपासना करताना देखील ज्ञानासह उपासना करावी, अन्यथा सुखाऐवजी दु:ख प्राप्त होईल. ‘ज्ञानरहित जे जे केले, ते ते दुःखाशी मुळ झाले’ हे सांगत त्यांनी ज्ञानाचे महत्त्व सांगितले. समाजातील गैरसमजांच्या मागे न लागता ज्ञानयुक्त उपासना आवश्यक असल्याचा सल्ला देखील सद्गुरुदास महाराज यांनी दिला. देवदर्शनाचे महत्त्व सांगताना त्यांनी, देव सर्वत्र असला तरीही मंदिरात दर्शन घेण्याचे विशेष महत्त्व आहे. उपासनेतून सत्शील कार्यकर्ते घडतील आणि ते राजकारण, राष्ट्रकारण उत्तम करू शकतील. यातून समृद्ध राष्ट्रनिर्मिती शक्य होईल, असेही यावेळी सद्गुरुदास महाराज यांनी सांगितले.
चौकट
गुरुवारी सकाळी गुरुपौर्णिमा कार्यक्रमाची सुरुवात काकडाने झाली. यानंतर सकाळी श्री गुरुमंदिरात पवमान अभिषेक करण्यात आला. त्याचवेळी गजानन महाराज मंदिर सहकारनगर येथे टेम्बेस्वामी, विष्णुदास स्वामी महाराज, सद्गुरुदास महाराज यांच्या पादुकांना रुद्राभिषेक करण्यात आला. यानंतर सनई-चौघड्यांच्या गजरात कार्यक्रमस्थळी सद्गुरुदास महाराज यांचे आगमन झाले. उपासनेनंतर वे.शा.सं. जोशी गुरुजी आणि सहकारी यांच्या पौरोहित्याखाली यजमान अजित-प्रज्ञा फडणीस व अवधूत-गौरी अगस्ती यांच्या हस्ते सद्गुरुदास महाराज यांची पाद्यपूजा करण्यात आली.
या द्विदिवसीय गुरुपूजन सोहळ्यात बुधवारी दुपारी टेम्बे स्वामींच्या पादुकांचे, तसेच साकोली येथील भाविकाने तयार केलेल्या सदगुरुदास महाराज यांच्या पादुकांचे आगमन झाले. यावेळी सद्गुरुदास महाराज यांनी अभंगावर निरुपण करीत भाविकांना मार्गदर्शन केले. आजच्या गुरुपूजन सोहळ्यात मोठ्या संख्येत भाविकांनी सद्गुरुदास महाराज यांचे पाद्यपूजन केले.