

जयश्री दाणी, मीरा टोळे यांच्या पुस्तकांचे थाटात प्रकाशन
नागपूर (Nagpur):- 11 एप्रिल
उत्कृष्ट समाज घडवायचा असे तर उत्तम मूल्य देणे आवश्यक असते. मीरा टोळे आणि जयश्री दाणी यांनी उत्तम साहित्यनिर्मिती करून त्यात मोलाची भर घातली आहे, असे प्रतिपादन संस्कार भारतीच्या अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी येथे केले. प्रसिद्ध लेखिका व कवयित्री जयश्री दाणी यांच्या ‘अनंदिता’, ‘धुरांच्या रेषा’ या कथासंग्रहाचे
आणि प्रवासवर्णनकार मीरा टोळे अद्भुत पूर्वांचल या प्रवासवर्णनपर संग्रहाचे प्रकाशन करताना त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष अश्विनी जिचकार यांची, तर भाष्यकार म्हणून ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. स. जोग आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्वाती धर्माधिकारी यांची उपस्थिती होती. दीक्षाभूमीजवळील नवदृष्टी सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला.
कथासंग्रहावर भाष्य करताना डॉ. जोग म्हणाले की, ह. ना. आपटे, प्र. के. अत्रे हे संदेशवाहक कथालेखक होते. त्यांच्या मांदियाळीत जयश्री दाणी यांनी आपले स्थान ठळकपणे निर्माण केले आहे. संग्रहातील कथांना भाषेचा भरजरी पोत व सूक्ष्म विचारसरणी आहे. डॉ. स्वाती धर्माधिकारी म्हणाल्या की, विदर्भातील प्रमुख प्रवासवर्णनकारांमध्ये मीरा टोळे यांची नक्कीच गणना होईल. अतिशय ओघवत्या भाषेत लिहिलेल्या या पुस्तकातून पूर्वांचलसंबंधी महत्त्वाची माहिती मिळते व प्रवासाची उत्सुकता वाढते. अश्विनी जिचकार यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले. प्रसिद्ध लेखक, नाटककार अशोक समेळ, प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ प्रचारिका सुनीता हळदेकर यांच्या शुभेच्छांचे वाचन करण्यात आले. मीरा टोळे यांनी मनोगतात पुस्तकामागची प्रेरणा विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विवेक अलोणी यांनी, तर आभारप्रदर्शन स्क्वेअर मीडिया पब्लिकेशनच्या प्रबंध संचालक मंजुषा जोशी यांनी केले. कार्यक्रमाला साहित्य रसिकांची मोठी उपस्थिती होती.