नागपूर : मराठा समाजाला मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजेच त्यांचे ओबीसीकरण करणे आहे. आम्ही हे कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, प्रसंगी महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही ,असा सज्जड इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. नागपुरातील संविधान चौकात गेल्या 13 दिवसांपासून ओबीसी समाजाचे, विविध संघटनांचे आंदोलन सुरू असताना सरकार त्याकडे लक्ष देत नाही 12 दिवसापासून चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावली आहे. याकडे सरकारला लक्ष देण्यास वेळ नाही. मराठा समाजाच्या उपोषणाची, आंदोलनाची तातडीने दखल घेण्यात आली. मात्र,ओबीसी समाजाला दुर्लक्षित केले जात आहे. हे केवळ मराठ्यांचे सरकार आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील पुन्हा साखळी उपोषण करणार असल्याचे वृत्त आहे. ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, ओबीसीतून आरक्षण दिले जाणार नाही असे सरकार सांगत असले तरी मनोज जरांगे पाटील आणि सरकार यांच्यातील चर्चेचे नेमके गुपित काय हे सरकारने उघड करावे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे आम्ही कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही.
60% ओबीसी समाज असून 400 जाती आहेत.एक जात विरुद्ध 400 जातींचा हा संघर्ष असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. एकंदरीत राज्यात मराठा आंदोलनासोबतच आता ओबीसी आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन नागपूरला सुरू करण्याचा इशारा डॉ तायवाडे यांनी दिला. मध्यंतरी जिल्हाधिकारी कार्यालयावर कुणबी आणि ओबीसी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. कुणबी समाज कृती समितीने या आंदोलनातून माघार घेतली असली तरी ओबीसी महासंघ आपल्या मागण्यांवर ठाम आहे. राज्य सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र सरसकट दिले जाणार नाही असे लेखी आश्वासन मिळेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही या निर्णयावर तायवाडे आजही ठाम आहेत हे विशेष.