

नागपूर (NAGPUR), २० एप्रिल:
उमरेडजवळ नुकताच आढळलेला धातूचा मोठा तुकडा हा अवकाशातील कचऱ्याचा भाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा तुकडा एखाद्या रॉकेटचा असावा, असा प्राथमिक अंदाज ISROच्या वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. सध्या त्याची सखोल वैज्ञानिक तपासणी सुरू आहे.
खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये दोन प्रमुख अवकाश मोहिमांचे अवशेष पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करताना दिसले होते. यामध्ये २४ मार्च रोजी स्पेस-एक्सचे क्रू-९ ड्रॅगन स्पेसक्राफ्ट तसेच इस्रोचे POEM-4 एक्सपेरिमेंट मॉड्युल आणि PSLV रॉकेट यांचा समावेश होता. हे रॉकेट ४ एप्रिलला पृथ्वीवर कोसळले असल्याचेही नोंदवले गेले आहे.
उमरेडजवळ सापडलेला तुकडा या रॉकेटांपैकी कोणत्याही मोहिमेशी संबंधित असू शकतो, तसेच इतर कोणत्याही अंतराळ यानाचा देखील असू शकतो, असे चोपणे यांनी सांगितले. ISROच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनीही हा तुकडा रॉकेटशी संबंधित असण्याची शक्यता असल्याचे मान्य केले.
याआधीही अशी घटना घडलेली आहे. २ एप्रिल २०२२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात चीनच्या लॉंग मार्च रॉकेटचे पाच तुकडे रात्रीच्या वेळेस कोसळले होते. त्यावेळी ISROचे वैज्ञानिक घटनास्थळी येऊन तपासणी करून ते तुकडे घेऊन गेले होते.
प्रा. चोपणे यांनी असेही नमूद केले की, आजच्या घडीला हजारो उपग्रहांचे आणि रॉकेटांचे तुकडे अवकाशात भटकंती करत आहेत. त्यापैकी काही तुकडे समुद्रात, तर काही जमिनीवर पडत असतात. सुदैवाने बहुतेकवेळा जीवितहानी होत नाही, पण अपवादात्मक प्रसंगी जीवित वा मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा घटनांमध्ये नुकसान भरपाईची स्पष्ट शासनव्यवस्था असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी प्रतिपादन केले.