राम मंदिर सोहळ्यासाठी सोनिया, खर्गेंना निमंत्रण

0

 

नवी दिल्ली- अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्र्स्टच्या वतीने ही निमंत्रणे देण्यात आली आहेत. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे हा कार्यक्रम होणार आहे. सोनिया गांधी, खर्गे हे या कार्यक्रमास जाण्याची शक्यता नसल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे. (Shri Ram Temple Event)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख राम लाल, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सोनिया गांधी आणि खरगे यांची भेट घेत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. या शिष्टमंडळाने माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना देखील कार्यक्रमाचे निमंत्रण पाठविले आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासासाठी पाहुण्यांची यादी काळजीपूर्वक तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये उद्योजक, शास्त्रज्ञ, अभिनेते, लष्करी अधिकारी, पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले मान्यवर, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा, योगगुरू बाबा रामदेव, उद्योगपती गौतम अदानी, उद्योगपती मुकेश अंबानी, अभिनेता अमिताभ बच्चन, अभिनेता रजनीकांत, अभिनेत्री माधुरी दीक्षित, रामायण मालिकेत प्रभू रामाची भूमिका करणारे अरुण गोविल, दिग्दर्शक मधुर भांडारकर, गीतकार प्रसून जोशी आदी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी काम करणाऱ्या कामगारांना देखील या सोहळ्यासाठी खास निमंत्रण आहे. गर्दीची समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन या कार्यक्रमासाठी प्रत्येकालाच आमंत्रित करणे शक्य नाही, मात्र, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अयोध्येत प्रत्येकाचेच स्वागत असल्याचे विश्व हिंदु परिषदेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे