
गोंदिया (Gondia) :- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसनेगोंदिया जिल्ह्यातील चार मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवारी (दि.६) साकोली येथील विश्रामगृहात घेण्यात आल्या. पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख माजी सतीश चतुर्वेदी यांनी या मुलाखती घेतल्या. यानंतर ते आपला अहवाल प्रदेश कमिटीकडे सादर करणार असून, कुणाला संधी मिळणार हे स्पष्ट होणार आहे.
काँग्रेसने दोन महिन्यांपूर्वी गोंदिया जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतील निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागविले होते. तेव्हा अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून १७, आमगाव मतदारसंघातून मतदारसंघातून १२, ९ तिरोडा व गोंदिया मतदारसंघातून ६ अशा एकूण ४४ इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले होते. या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवारी साकोली येथील शासकीय विश्रामगृहात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी मुलाखती घेतल्या. मुलाखतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता उमेदवारी कुणाला मिळणार याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या निवडणुका महाविकास आघाडी करून लढविणार जाणार असल्या तरी काँग्रेसने जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघापैकी गोंदिया मतदारसंघावर उद्धव सेना आणि तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव या दोन मतदारसंघांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने दावा केला आहे. या मतदारसंघातून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तीन जागांवरून महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या उद्धव सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
















