नागपुरातील फिल्म महोत्सवात बघता येणार ‘शॉर्ट फिल्म’

0

नागपूर (NAGPUR): ११ “आतंरराष्ट्रीय शॉर्ट” फिल्म उद्या शनिवार, दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजल्या पासून सुरु होणार असून ७ व ८ डिसेंबर असे दोन दिवस ह्या महोत्सवात चित्रपट प्रेमींना शॉर्ट फिल्म्स बघता येणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ‘पिफ’ चे क्रिएटिव्ह दिग्दर्शक, एफटीआयआय चे पूर्व प्रमुख समर नखाते पूर्ण वेळ उपस्थित राहणार असून त्यांचे मार्गदर्शन रसिकांना मिळणार आहे. तसेच राकोश, केपेचिनो फिल्म्सचे निर्माता व दिग्दर्शक संतोष देशपांडे यांच्या उपस्थितीत या महोत्सवाला सुरुवात होईल. बर्लिन इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल, कान्स सारख्या नामांकित फिल्म उत्सवात प्रदर्शित झालेले जापान, फ्रान्स, मलेशिया, आयर्लंड, क्यूबा, अमेरिका, स्वित्झर्लंड, स्पेन, ब्राझील, तायवान, नेपाळ, सिंगापूर येथील सर्वोत्कृष्ट लघुपट या शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमधे दाखवले जाणार आहेत.

हा दोन दिवसीय शॉर्ट फिल्म महोत्सव राष्ट्रभाषा भवन, उत्तर अंबाझरी मार्ग, रामदासपेठ, नागपूर येथे होणार आहे.

जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या नेतृत्वात ‘पिफ’ ही पुण्याची जागतिक ओळख झालेली आहे व तेच पर्व मागच्या वर्षी नागपुरात नागपूर एडिशन म्हणून सुरू झाले. त्या माध्यमातून हा महोत्सव मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशनच्या सहयोगाने नागपुरात घेण्यात येतो आहे.

हा महोत्सव रसिकांसाठी निःशुल्क असून नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ८६००० ४४४३२ या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन महोत्सवाचे संयोजक अजेय गंपावार यांनी केले आहे.