
ध्यान हा आपल्या पूर्वजांचा शोध आहे
स्वतः च्या इच्छेने ध्यान म्हणजे लक्ष द्यायचे म्हणजे ध्यान होय. हे लक्ष कसे आणि कुठे द्यायचे यावरून ध्यानाचे चार प्रकार करता येतात.
1 एकाग्रता ध्यान – एक शब्द, ज्योत, श्र्वासाचा स्पर्श असे एक आलंबन निवडून त्यावर लक्ष देत राहायचे. त्यावेळी अन्य विचार येणे कमी होणे आणि त्यासाठी अधिकाधिक एकाग्र होणे अपेक्षित असते. बाह्य आवाज ऐकू येत नाहीत , लक्ष पूर्णतः एकाच अलंबनावर राहणे हे यामध्ये अपेक्षित असते. असे झाले की त्याला ध्यान लागणे असे म्हणतात.असे ध्यान लागते त्यावेळी मानसिक शांती अनुभवता येते. मात्र अशी एकाग्रता विकसित होणे सोपे नसते
2 कल्पना दर्शन ध्यान – कल्पना करून एखादे दृश्य, मूर्ती, प्रसंग पाहायचा आणि त्यावर एकाग्र व्हायचे. रामरक्षा, अथर्व शीर्ष अशा स्तोत्रात त्या त्या देवतेचे कल्पना दर्शन ध्यान सांगितले आहे. कल्पना करून कोणतेही दृश्य पाहिले की त्यानुसार शरीरात रसायने पसरतात आणि मनातील भावना बदलतात. एखाद्या कृतीची मानसिक तालीम मेंटल रिहर्सल करण्यासाठी असे ध्यान करता येते. त्यामुळे क्रीडा मानस शास्त्रात याचा उपयोग करून घेतला जातो. असा सराव केला की शरीरातील स्नायूंमध्ये तत्काळ कृती करण्याची क्षमता विकसित होते.
3 करूणा ध्यान – मुद्दाम विचार करून मनात निरपेक्ष प्रेम, कृतज्ञता, क्षमा, करूणा अशा उन्नत भावना निर्माण करणे आणि काही वेळ त्यांची धारणा करणे हे करूणा ध्यान आहे. सर्व धर्मातील प्रार्थना या करूणा ध्यान आहेत. पसायदान, विश्व प्रार्थना म्हणत असताना मनात त्या भावना निर्माण केल्या की हा ध्यान सराव होतो. असा सराव केला की मनात सकारात्मक भावना वाढतात. आनंदाचा अनुभव येतो.
4 साक्षी ध्यान – या ध्यानाचा सराव करताना एकाग्रता अपेक्षित नसते. मुद्दाम ठरवून कोणताही विचार करणे, कल्पना करणे अपेक्षित नसते. मनात आपोआप विचार येत असतात, त्यावर कोणताही विचार करत न राहता कोणते विचार आपोआप येतात याचे भान ठेवायचे आणि शरीरात जे काही जाणवते त्याचेही भान विकसित करायचे. हा साक्षी ध्यानाचा पहिला टप्पा असतो. असे भान विकसित केले की जे काही जाणवते त्याचा स्वीकार करायचा, म्हणजे आसक्ती आणि द्वेष , हे हवेच ,हे नकोच अशा प्रतिक्रिया करायच्या नाहीत. शरीर आणि मन याकडे साक्षी होऊन पाहायचे. विपश्यना, अष्टावक्र गीता, निर्वाण षटक हे साक्षी ध्यान आहे.
आपल्या पूर्वजांनी हे ध्यान काम क्रोध इत्यादी विकारांपासून मुक्त होण्यासाठी शोधून काढले. त्याचा परिणाम भावनिक मेंदूवर होतो आणि त्यामुळे राग, चिंता, भीती, उदासी अशा त्रासदायक भावना कमी होतात हे आधुनिक संशोधनात आढळून येत आहे.
भावनिक बुद्धी विकसित करण्यासाठी हे ध्यान खूप उपयुक्त असल्याने घरोघरी याचा सराव व्हायला हवा.
जागतिक ध्यान दिनाच्या निमित्ताने ध्यानविषयी माहिती घेऊन, त्यातील गूढता काढून टाकून शरीर मनाच्या आरोग्यासाठी रोज किमान दहा मिनिटे ध्यान सराव करायचा असा संकल्प आपण सर्वांनी करूया.
डॉ यश वेलणकर
















