महिला कला निकेतन’ला संस्थागत पुरस्कार

0

रविंद कडबे मार्डीकर स्मृती पुरस्कार जाहीर

 

नागपूर (Nagpur ):नागपुरातील मार्डीकर परिवार आणि युवा झेप प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. सौ. रंजना भालचंद्र मार्डीकर व कै. भालचंद्र प्रभाकर मार्डीकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या मार्डीकर स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अमरावतीच्या ओलावा फाऊंडेशनचे अध्यक्ष अरविंद कडबे यंदाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. नागपुरातील महिला कला निकेतनला संस्थागत पुरस्कार जाहीर झाला आहे.
यासंदर्भात माहिती देताना अरविंद मार्डीकर आणि युवा झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांनी सांगितले की, मार्डीकर परिवार आणि युवा झेपच्या संयुक्त विद्यामाने दिल्या जाणा-या या पुरस्काराचे यंदा दहावे वर्ष आहे. प्रसिद्धी न करता समाजातील विविध सेवाकार्यात अविरत योगदान देणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. धनादेश, मानपत्र आणि संग्रहणीय ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप असते. दरवर्षी 24 एप्रिल रोजी हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा या पुरस्काराचे मानकरी अमरावतीच्या ओलावा फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि जलनायक म्हणून सर्वश्रुत असलेले अरविंद बाळकृष्ण कडबे आणि नागपूरच्या गोरेपेठ परिसरातील महिला कला निकेतन (संस्थागत) आहेत. यासोबतच दरवर्षीनुसार डॉ. हेडगेवार स्मारक समितीला गुरूदक्षिणा अर्पण करण्यात येईल. महिला कला निकेतनचा पुरस्कार संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती प्रेरणा जामदार यांना सोपवणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सत्कारमूर्तीचा कार्याढावा

अरविंद बाळकृष्ण कडबे- स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय जलकोष्ठ प्रमुख असलेले अरविंद बाळकृष्ण कडबे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादित केली. विविध महाविद्यालयांमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य केले. अरविंद कडबे ओलावा फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांपासून जलसंवर्धनाचे कार्य करीत आहेत. जलसाक्षरता, जलसंवाद, शेतकरी कार्यशाळा, जैविक शेती आणि जलसंवर्धनाचे कार्य ते अविरतपणे करीत आहेत. शेतकऱ्यांच्या कार्यशाळा आणि जलप्रदूषण निर्मूलन या क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यासोबतच विविध नियतकालिके आणि वर्तमानपत्रात जलसंवर्धन आणि जलसाक्षरता याविषयावर कडबे यांनी विपुल लेखन केले. सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांचे दुष्परिणाम आणि दुष्काळ यावर देखील कडबे यांचा दाणगा अभ्यास आहे. कडबे यांचा तहानलेला महाराष्ट्र हे लेक 2004 मध्ये महाराष्ट्रात खूप गाजला होता. त्यानंतर राज्य सरकारने त्यांनी चला जाणूया नदीला या उपक्रमाचे समन्वय म्हणून जबाबदारी दिली होती. त्यासोबतच जॉईंटस इनंटरनॅशनल रोटरी लायन्सच्या बॅनरखाली त्यांनी अनेक कार्यशाळा राबवून जमाजात जलसाक्षरता आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

महिला कला निकेतन- श्रीमती प्रेरणा जामदार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरच्या गोरेपेठेतील महिला कला निकेतन विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकोपयोगी उपक्रम राबवते. संस्थेतर्फे सांस्कृतिक लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी कार्यशाळांचे आयोजन केले जाते. त्यासोबतच खाद्य पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण, पाऊल भजन, बालविकास,बालसंस्कार, हस्तकला, शिक्षीका प्रशिक्षण, स्किल डेव्हलपमेंट, महिला रोजगार आणि महिला सक्षमीकरण इत्याची विविध क्षेत्रात महिला कला निकेतन गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करीत आहे. समाजातील लहान मुले, तरुण-तरुणी, महिला यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी, स्वाभिमानी आणि सक्षम समाजाच्या उभारणीत या संस्थेचे मोठे योगदान आहे.