रात्रकालीन एकांकिका स्पर्धेचा नागपुरात अभिनव प्रयोग

0

१००व्‍या नाट्यसंमेलनाला प्रारंभ

(Nagpur): नागपूर दिवसा एकांकिका स्पर्धा आयोजित करणे आयोजक आणि कलावंत यांचेसाठी किती आव्हानात्मक असते, ही सगळेच जाणतात. 100 व्‍या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने रात्रकालीन एकांकिका स्पर्धा घेण्याचे धाडस नागपूरच्या नाट्य परिषदेने केले, असे म्हणत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम हेमंत पाटील यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 100 वे विभागीय मराठी नाट्यसंमेलन 24 ते 27 या दरम्यान नागपूर येथे आयोजित करण्यात आले असून यानिमित्त गुरुवारी पूर्वरंगातील डॉ. गिरीश गांधी गौरवार्थ रात्रकालीन एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन हेमंत पाटील यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील होते तर झाडीपट्टी कलावंत पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, ज्येष्ठ रंगकर्मी शेखर बेंद्रे, अभिनेत्री काजल राऊत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नरेश गडेकर यांची उपस्थिती होती.

परशुराम खुणे म्हणाले, नागपूर नगरीला चार दिवस नाटकांची मेजवानी मिळणार असून याचे मूल्य मोठे आहे. यातून नवीन कलावंत निर्माण होणार आहे. झाडीपट्टी चे कार्यक्रम होणार असून झाडीपट्टी रंगभूमी व शहरी रंगभूमीचे या संमेलन निमित्ताने मनोमिलन होत आहे.

अजय पाटील यांनी रात्रकालीन एकांकिका स्पर्धेचे आयोजनचे धाडस नरेश गडेकर यांनी केले असल्याचे सांगत अनेक जण संमेलनाच्या सफलतीसाठी झटत असल्याचे सांगितले.

नरेश गडेकर यांनी प्रास्ताविकातून एकांकिका स्पर्धेच्या आयोजनामागची भूमिका सांगितली. कलावंत घडावे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

रात्रभर चाललेल्या या स्पर्धेत मुंबई, अंबरनाथ, अमरावती, ठाणे आणि नागपूरच्या 9 एकांकिका सादर झाल्या. त्यात प्रो इव्हेंटिस मुंबईचे ‘चानू’, चंद्रस्था थिएटर्स नागपूरचे ‘डार्क एज’, इथ इति नाट्यकला प्रतिष्ठान अमरावतीचे ‘मधुमोह’, बहुजन रंगभूमी नागपूरचे ‘गटार’, एम स्टुडिओ नागपूरचे ‘लेखिका’, तांडव क्रिएशन नागपूरचे ‘दृष्टांत’, थोरवी थिएटर्स नागपूरचे ‘बाप’, नाण्य परिवार ठाणेचे ‘इथे चूल कोणी मोडू नये’ आणि निओकास्ट थिएटर नागपूरचे ‘द डील’ यांचा समावेश होता. एकांकका स्पर्धेचे परीक्षण अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, ज्येष्ठ रंगकर्मी शेखर बेंद्रे, अभिनेत्री काजल राऊत यांनी केले.
सुरुवातीला पुलवामातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही चवरे सोईतकर यांनी केले. अनिल इंदाणे यांनी आभार मानले.