

नागपूर(Nagpur)14 जुलै :- दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरिता ट्रॅफिक नियमांबाबत समाजाने संवेदनशील होणे आवश्यक असल्याचे मत आदर्श विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष अनिल सारडा यांनी व्यक्त केले. ते जनआक्रोशद्वारा आयोजित ड्रायव्हर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
धरमपेठ येथील ट्रॅफिक पार्क येथे रविवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात मंचावर अनिल सारडा यांच्यासह, जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर, मनीषा ट्रॅव्हल्सचे राजेश वानखेडे उपस्थित होते.
सद्यस्थितीत अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता अशा प्रबोधनाची खूप गरज आहे. बहुतेक अपघात हे वाहनाच्या वेगामुळे होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे विशेषतः युवा वर्गाला वाहतूक नियमांबाबत सजग करायला हवे, असे अनिल सारडा म्हणाले. यानंतर सुबोध देशपांडे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे वाहतुकीचे नियम, त्याच्या चिन्हांचा अर्थ याबाबत उपस्थित वाहकांना माहिती दिली. वाहन नियंत्रणात असेल तर अपघात होण्याची शक्यता कमी असते. याकरिता शारीरिक नियंत्रण, गाडीची स्थिती, वाहन चालवताना एकाग्रता आवश्यक आहे. ओव्हरटेक करताना, लाईन बदलताना काळजी घेतल्यास अपघात टाळता येतात, असे ते म्हणाले.
नियमांबाबत अधिक माहिती देताना अनिल जोशी म्हणाले, भारतात प्रत्येक 3 मिनिटाला 1 अपघात होतो. साधारण 18 ते 45 या वयोगटातील अपघाताचे प्रमाण 70 टक्के आहे. वाहन चालवताना 1 सेकंद वाचवला तर 50 टक्के अपघाताचे प्रमाण कमी होते. ठिकठिकाणी वाहतुकीच्या नियमांबाबत, वेगाबाबत सूचना लागलेल्या असतात. पण गाडीच्या वेगामुळे त्याकडे दुर्लक्ष होते. चालकाला वाहन चालवताना नॉलेज आणि स्कील या दोन गोष्टी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश पोहणे यांनी, तर आभार प्रदर्शन संदीप अग्रवाल यांनी केले. यावेळी डॉ अशोक करंदीकर, प्रकाश खांडेकर, दत्ता कुलकर्णी, डॉ मदन कापरे दाम्पत्य,
डॉ अर्चना कोठारी, मिलिंद रहाटगावकर, नेवील कासद, संगीता मेलग, गिरीश देशपांडे, विवेक अमीन, रमेश शाहारे, रमेश लोखंडे अशोक करंदीकर आदींसह मोठ्याप्रमाणात स्कूलबसचे वाहन चालक उपस्थित होते.