

नवी दिल्ली (New Delhi), 11 सप्टेंबर : भारत लवकरच सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी केले. मोदींच्या हस्ते आज, बुधवारी उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे सेमिकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, करोडो भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सेमीकंडक्टर हे एक माध्यम आहे. आज भारत सेमीकंडक्टरचा प्रमुख ग्राहक आहे. सेमीकंडक्टरच्या माध्यमातून आम्ही भारतात जगातील सर्वोत्तम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत.
ग्रेटर नोएडा येथे 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान चालणाऱ्या या कार्यक्रमाची थीम ‘शेपिंग द सेमी कंडक्टर फ्युचर’ आहे आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील भारताच्या महत्त्वाकांक्षा ठळकपणे मांडण्याचा उद्देश आहे.
सेमीकंडक्टर डिझाइन, उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासासाठी भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थापित करणे हे आपले ध्येय आहे, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.