India : भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल

0
shankhnnad newa

पुणे(Pune), 12 जुलै :- भारताचे लोकसंख्याशास्त्रीय वय तरुण आहे. भारताचे सरासरी वय २९ वर्षे असून २०४७ पर्यंत ते केवळ ३५ वर्षे झाले असेल. लोकसंख्या हा निकष भारताच्या बाजूने आहे. भारताचा झपाट्याने कायापालट करण्यासाठी लोकसंख्याशास्त्राचा योग्य वापर आवश्यक आहे. सन २०२७ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. असे विधान श्री. अमिताभ कांत(Mr. Amitabh Kant), G20 शेर्पा, भारत यांनी केले.

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) तर्फे आज, शुक्रवारी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे, पुणे येथील कॅम्पसमध्ये “फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स या व्याख्यानमाले चे आयोजन करण्यात आले होते. श्री. अमिताभ कांत, जी २० शेर्पा, इंडिया यांना या व्याख्यानमालेसाठी प्रतिष्ठित वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. “भारताचे भविष्य घडवणे : तरुणांची भूमिका” (“Building India’s Future : Role of Youth”) हा त्यांचा व्याख्यानाचा प्रमुख विषय होता. प्रा.(डॉ.) शां. ब. मुजुमदार, संस्थापक व अध्यक्ष, सिंबायोसिस आणि कुलपती,सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री कांत म्हणाले, जी 7, जी 20 आणि अगदी रशिया-युक्रेन युद्धामध्ये एकमत घडवून आणणारा भारत हा एकमेव देश आहे. भारताने जी 20 मध्ये आफ्रिका खंडाला सामावून घेऊन जी 20 ला जी 21 बनवले. आफ्रिकन युनियन देखील आता आता धोरण ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

भारतातील तरुण युवकांनी डिजिटल जगामध्ये मोठे योगदान दिले आहे. मोबाईलद्वारे डिजिटल फास्ट पेमेंट शक्य झाले आहे यामध्ये ३० सेकंद ते १ मिनिटात व्यवहार होतात. झेरोधा, अपस्टॉक्स, ग्रो सारख्या तरुणांनी स्थापन केलेल्या कंपन्यांचे भारतीय शेअर बाजारात ३० टक्के योगदान आहे असे देखील श्री कांत यांनी सांगितले.

आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला, त्यांनी नमूद केले की, तुमचा आपल्या देशावर- भारतावर विश्वास असला पाहिजे. नेहमी आशावादी रहा. जीवनातील आपले परिणाम परिभाषित करा आणि नेहमी त्यांच्यासाठी कार्य करा. नेहमी धैर्यवान रहा आणि जोखीम घ्या. तुमच्यात बदल घडवून आणण्याची क्षमता आहे हे लक्षात ठेवा. अथक तयारी करा, अथक तयारीशिवाय कोणीही यशस्वी झालेले नाही. अभ्यास करत राहा, वाचत राहा, जीवनात कठोर परिश्रमाशिवाय दुसरे काहीही नाही. नेहमी तरुण आणि उत्साही लोकांबरोबर राहा नवनवीन तंत्रज्ञानाचा नेहमी वापर करा.

डॉ.शां. ब . मुजुमदार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले कि, विद्यार्थी हे भारताचे भविष्य आहेत आणि हेच तरुण विद्यार्थी आपल्या देशाचे भविष्य काय असेल हे ठरवणार आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या मते “२० वे शतक पाश्चिमात्य जगाचे असेल तर २१ वे शतक भारताचे असेल” माझ्या मते, २१ वे शतक हे भारताचे शतक बनविण्याची क्षमता ही केवळ शिक्षणातच आहे. पूर्वेचे शहाणपण आणि पाश्चात्यांची गतिशीलता जागतिक नागरिक घडवू शकते, असे डॉ. मुजुमदार पुढे बोलताना म्हणाले.

डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका, सिंबायोसिस व प्र- कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ ) यांनी स्वागतपर भाषण केले व डॉ. रामकृष्णन रमण कुलगुरू, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ ) यांनी आभार प्रदर्शन केले.

India in marathi
India west indies
India cricket
India match
India map
Indian movie
Indian School
India Live