

5 ऑगस्टपूर्वी नोंदणी करण्याचे खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे आवाहन
नागपूर (Nagpur) :- गणेशोत्सवाचे दिवस जवळ येत असून उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील गणेशोत्सव मंडळांनी ‘सांस्कृतिक’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे. वाढता प्रतिसाद व मागणी बघता कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट करण्यात आली असून गणेशोत्सव मंडळांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाद्वारे यावर्षी नाट्य संगीत, सुगम संगीत (भावगीत, भक्तिगीत, अभंग, देशभक्तीपर गीत, गीतरामायणावर आधारित निवडक गीते) भजन, कीर्तन, देशभक्तीपर नृत्य, गोंधळ, भारूड, नकला, एकल व समूह नृत्य, समूह वादन, कथाकथन, रांगोळी प्रशिक्षण, पारंपरिक खेळ, एकपात्री प्रयोग, कविसंमेलन (हिंदी व मराठी), लोकनृत्य, जादूचे प्रयोग, जागरण, दृकश्राव्य कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. इच्छूकांनी नोंदणी करीता व अधिक माहितीकरिता श्री. नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय, सावरकर नगर, ऑरेंज सिटी हॉस्पिटल समोर, खामला चौक, नागपूर येथे 5 ऑगस्ट पर्यंत सकाळी 12 ते 3 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव (Khasadar Cultural Festival) समितीतर्फे करण्यात आले आहे.