

नागपूर(Nagpur), 7 जुलै :- महिलांमध्ये प्रचंड शक्ती असते. त्यांनी या शक्तीचा उपयोग मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्यासाठी करावा व संस्कारक्षम नागरिक घडवावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ती व संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचनताई गडकरी(Kanchantai Gadkari) यांनी केले.
इनर व्हील क्लब ऑफ नागपूरच्या 2024-25 च्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी संचेती पब्लिक स्कूलमधील नारायणी हॉलमध्ये पार पडला. डॉ. शीला कुळकर्णी यांनी पास्ट प्रेसिडेंट डॉ. भाग्यलक्षी राजन यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
नवीन कार्यकारिणीमध्ये आयपीपी भाग्यलक्ष्मी राजन, उपाध्यक्ष अलापिनी विलायची, सचिव पूजा सावजी, कोषाध्यक्ष डॉ. अनघा अंबुलकर, आयएसओ डॉ. अश्विनी ओखळकर, सीसी लक्ष्मी चौधरी, क्लब अॅडव्हायझर सुप्रिया जोशी यांच्यासह सदस्य गीता पत्की, अंशू शुक्ला, अंजली नागपूरकर, मीनाक्षी देशपांडे, मीनल दवंडे, रुचिका वानखेडे, सोनाली दळवी यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला इनर व्हील जिल्हा अध्यक्ष जयश्री पोफळी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अॅनाकॉन लॅबच्या संचालिका डॉ. सुगंधा गारवे यांना यावेळी ऋचा देशपांडे पुरस्कृत ‘उद्योजक पुरस्कार’ तर आरोह संस्थेच्या संस्थापक विश्वस्त शर्मिष्ठा गांधी यांना डॉ. अश्विनी उकलकर पुरस्कृत ‘सामाजिक कार्यकर्ता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी क्लबच्या नवीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
डॉ. राजन यांनी 2023-24 मध्ये राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. शीला कुळकर्णी यांनी क्लबच्यावतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून मानवतेची सेवा करण्याचे आश्वासन दिले. जयश्री पोफळी यांनी समाजातील गरजूंसाठी काम करण्याचे सदस्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना मराठे यांनी केले तर अलापिनी विलायची यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शीला देशमुख,अपर्णा चव्हाण, गौरी धोंड, ऋचा देशपांडे, नेहा मुंजे आणि सारिका चौधरी यांचे सहकार्य लाभले.