
नवी दिल्ली- आगामी G20 जी-२० परिषदेसाठी देशांना पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिण्यात आले असल्याने नवा वाद सुरु झाला आहे. (India Vs Bharat Politics on G-20 issue) काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया वेबसाईट एक्सवर पोस्ट करत याबाबत दावा केला आहे. सरकारने निमंत्रण पत्रिकेत देशाचे नाव बदलल्याचा आरोप रमेश यांनी केला. तर आम आदमी पार्टीने देखील या मुद्यावर टीका केली आहे.
जी-२० ची बैठक ९ ते १० सप्टेंबर दरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानावर होणार आहे. या बैठकीच्या डिनरला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती भवनातून निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. त्यात प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असे लिहिले आहे. जयराम रमेश यांच्या आक्षेपानंतर लगेचच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही एक्सवर पोस्ट करून त्यात रिपब्लिक ऑफ भारत- आनंद आणि अभिमानाचा अनुभव होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. आपली संस्कृती अमृत कालच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. दरम्यान, काँग्रेसनंतर आम आदमी पार्टीने देखील त्यावर आक्षेप घेतला. खासदार राघव चढ्ढा म्हणाले भाजप इंडियाला कसे संपविणार? देश कोणत्याही एका पक्षाचा नाही. आमची राष्ट्रीय ओळख भाजपची खासगी संपत्ती नाही, असेही ते म्हणाले.

अशीही चर्चा, इंडिया वगळणार
दरम्यान, १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडिया शब्द हटविण्यासाठी विधेयक येणार असल्याचा दावा काही प्रसार माध्यमांनी केला आहे.यासंदर्भात केंद्र सरकारकडून तयारी सुरु असल्याचे सांगण्यात आले. अलिकडेच भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना ब्रिटीशांनी केल्याचा उल्लेख केला होता.