

रामस्मरण व्याख्यानमालेचा दुसरा दिवस
नागपूर (Nagpur): राम हे भारताचे दैवत आहे. त्याच्या लिलाविलासाचा एक भाग म्हणजे कुटुंबवत्सल राम. भगवान विष्णूंचा सातवा अवतार म्हणजे राम. पापातून जो जगाला तारून नेतो तो राम. कलियुगात रामचिंतन, रामस्मरणाशिवाय गती नाही. रामस्मरण व्याख्यानमालेत डॉ. वृषाली जोशी बोलत होत्या.
रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात केशवनगर सांस्कृतिक सभा आणि कलासंगम, कला व सांस्कृतिक मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुनील देवउपाध्ये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू असलेल्या रामस्मरण व्याख्यानमालेचे सोमवारी दुसरे पुष्प विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय संघटन मंत्री डॉ. वृषाली जोशी यांनी गुंफले. अध्यक्षस्थानी कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्ता ज्योत्स्ना पंडित होत्या.
डॉ. जोशी ‘ज्ञानं परमगुह्यं में’ या श्लोकाची फोड करून सांगताना म्हणाल्या, विज्ञान हा मूळ शब्द भारताने दिले आहे. ज्याचा भागवतात उल्लेख आहे. परमात्म्याचा ऋणानुबंध हा त्या-त्या तोडीच्या लोकांशीच होतो. सर्वांच्या रोमारोमात राम आहे. पण त्या चिंतनातून आपण आपल्या जीवनाकरिता काय उपयोग करतो, याचे चिंतन करणे आवश्यक आहे. रघुकुल रीत सदा चलि आई, प्राण जाये पर बचन न जाई या प्रमाणे प्रत्येक तत्त्वाचा आदर्श सापडतो ते रामाचे कुटुंब आहे. कौटुंबिक जीवनात आई, पत्नी, पती, माता या शब्दांचा सुंदर अर्थ त्यांनी यावेळी सांगितला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. व्यासपीठावर कलासंगमच्या साधना उन्हाळे, सारिका चिंचमलातपुरे, केशवनगर सांस्कृतिक सभेचे सचिव प्रकाश देशपांडे, उर्मिला सराफ यांचीदेखील उपस्थिती होती. यानंतर केशवनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘मेरे घर राम आये है’ हे गीत सादर केले.
ज्योत्स्ना पंडित म्हणाल्या, त्रेता युगातला राम आम्हाला आजही आठवावा वाटतो, यातच रामाचे महत्त्व सिद्ध होते. हॅम्लेट हे नाटक नवरसपूर्ण आहे, पण त्यावरही रामकथा विजय मिळविते. राम हा मानवीय सभ्यता टिकविणारा पहिला राजा आहे. त्याच्या वाणी आणि करणीत काही फरक नव्हता, म्हणून राम पुरुषोत्तम होता.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकाश एदलाबादकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. मिलिंद भाकरे यांनी आभारप्रदर्शन
व्याख्यानमालेचा आज समारोप
मंगळवार, 16 रोजी ‘बिंबब्रह्म आणि वास्तुब्रह्म’ या विषयावर भारतीय विद्या अभ्यासक प्रवीण योगी यांचे समारोपीय व्याख्यान.