

टेक-नेक्स्ट असोसिएशनच्या शतकी सत्राचे यशस्वी आयोजन
नागपूर (Nagpur), 18 ऑगस्ट 2024
कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) (Artificial Intelligence)च्या प्रभावामुळे बँकिंग, शिक्षण, आरोग्य, उद्योग, आयटी, कृषी, सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल हेाती. ऑनलाईन प्रणालीमुळे सर्व लोक घरूनच काम करू शकतील. अशावेळी ऑफिसेस म्युझियममध्ये बदलतील, असे मत प्रसिद्ध लेखक, उद्योजक, एल अँड टी टेक्नॉलॉजीचे सर्व्हिसेस, सिंटेल आणि पटनी काम्प्युटर सिस्टीमचे माजी सीईओ अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
टेक-नेक्स्ट असोसिएशनच्या ऐतिहासिक शतकी सत्राच्या निमित्ताने रविवारी अच्युत गोडबोले यांचे ‘एआय: इनोव्हेशन, इम्पॅक्ट आणि फ्युचर पर्स्पेक्टिव” विषयावर व्याख्यान पार पडले. टॅमरिंड हॉल, चिटणवीस सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवकांसह इतरांची गर्दी झाली होती. टेक-नेक्स्ट असोसिएशनचे अध्यक्ष अभिनय ढोबळे, माजी अध्यक्ष डॉ. विशाल लिचडे, प्रविण पंचभाई यांच्या हस्ते अच्युत गोडबोले यांचा सत्कार करण्यात आला.
1960 पासून जगातील तंत्रज्ञान कसे टप्प्याटप्प्याने बदलत गेले याबद्दल सविस्तर सांगताना अच्युत गोडबोले यांनी 2017 सालानंतर एआय, क्लाऊड कम्युटींग, व्हर्च्युअल रिअॅलिटी युक्त इंडस्ट्री 5.0 जगावर हावी झाल्याचे सांगितले. एआयमुळे ट्रॅव्हल एजंट, बुक शॉप्स, दुकाने यासारखे मध्यमवर्गीय व्यवसाय संपुष्टात येतील असे सांगताना त्यांनी युवकासाठी भविष्यातील जग एकदम वेगळे राहील. 60 टक्के नोक-या संपुष्टात येतील, नोक-यांचे स्वरूप बदलेल, असे सांगितले. अशा भयावह परिस्थितीत टिकून राहण्यासाठी त्यांनी युवावर्गाला काही टिप्स दिल्या. तसेच, त्यांच्या शंकांचे निरसन केले.
अभिनय ढोबळे यांनी विविध उपक्रमाची माहिती दिली. टेक-नेक्स्ट ही मध्य भारतातील तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम घेणारे पहिले संघटन असल्याचे सांगितले. या सत्राचे प्रकल्प संचालक महेंद्र गिरीधर होते तर मॉडरेटर मिली जुनेजा होत्या.
हेमंत झुंजूरकर, जयंती पटेल, रोहित दुजारी, नरेश वासू, आशिष अडबे, शीतल लिचडे, नरेंद नेवारे, सुधीर लातुरकर, प्रसन्न दाणी यांच्यासह आरके टेक्नो कन्सल्टंट्स प्रा. लि., पल्स सिस्टम्स, श्री नित्या, पीएसएटीलिंक सर्व्हिसेस, सार एज्युकेशन (आय) प्रा. लि. रेड अलर्ट सेक्युरिटी सिस्टीम, एसजी एम्बेडेड सोल्युशन्स आणि साबू होममेकर यांचे उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.
अच्युत गोडबोले म्हणाले,
– जुने ते विसरा आणि नवनवे तंत्र शिकण्याचा ध्यास धरा.
– ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रातील ज्ञानाचा पाया मजबूत करा.
– इंग्रजी भाषा शिका, तेच संवाद कौशल्य, टीमवर्क सारखे साफ्टस्किल आत्मसात करा.
– व्यक्तिमत्व विकसीत करा.
– नोकरीचा विचार न करता स्वत:चा व्यवसाय सुरू करा.
– चांगला माणूस बना आणि समाजाच्या खालच्या स्तरातील लोकांसाठी काम करा.