न्यायालयात बिनशर्त माफी

0

पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीचे प्रकरण

नवी दिल्ली (New Delhi), 02 एप्रिल : पतंजली आयुर्वेद कंपनीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी बाबा रामदेव (Baba Ramdev)यांनी आज, मंगळवारी सुप्रीम कोर्टात बिनशर्त क्षमायाचना केली. गेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते. त्यामुसार हे दोघे न्यायालयात हजर झाले होते. सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर दोघांनीही न्यायालयाकडे बीनशर्त माफी मागितली.

पतंजली आयुर्वेद कंपनीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसंदर्भात मेडिकल काऊन्सील ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या सुनावणीत पतंजलीने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती मागे घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच, जाहिराती मागे घेतल्या नाहीत तर पतंजलीच्या प्रत्येक जाहिरातीवर 1 कोटी रुपये एवढा दंड लावला जाईल, असेही न्यायालयाने सांगितले होते.

त्यानंतरही पतंजलीकडून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती सुरुच राहिल्यात. त्यामुळे पतंजलीच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी झालेल्या मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव या दोघांनाही कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते. याप्रकरणी न्या. अमानुल्लाह आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे आज, मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान बाबा रामदेव यांचे वकील म्हणाले, अशा जाहिरातीसाठी आम्ही माफी मागतो. न्यायालयाच्या आदेशानंतर, स्वतः योग गुरू बाबा रामदेव न्यायालयात आले आहेत. ते माफी मागत आहेत आणि आपण त्यांची माफी रिकॉर्डमध्ये घेऊ शकता असे रामदेव यांच्या वकिलांनी सांगितले.

यावेळी पतंजलीचे वकील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसंदर्भात म्हणाले की, पतंजली आयुर्वेदच्या मिडीया विभागाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती नव्हती. त्यामुळे अशी जाहिरात करण्यात आली असा खुलासा वकिलांनी केला. त्यांच्या या युक्तीवादावर न्यायालया म्हणाले की, कोर्टाच्या आदेशासंदर्भात पतंजलीच्या जाहिरात विभागाला माहिती नव्हती असे गृहित धरणे अवघड आहे. यावेळी न्या. अमानुल्लाह यांनी रामदेव बाबा यांनी केलेल्या योगाच्या प्रचाराचे कौतुक केले. परंतु, दिशाभूल करणाऱ्या पतंजलीच्या जाहिरातींबद्दल नाराजी व्यक्त करत भविष्यात सतर्क राहण्याचा इशारा दिला.