

चंद्रपुरात धनोजे कुणबी समाजाचा काँग्रेसवर संताप
प्रतिभा धानोरकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना धनोजे कुणबी समाजातील नेत्यांनी दाखवली पाठ
धनोजे कुणबी समाजाने काँग्रेसच्या घराणेशाहीवर व्यक्त केली चीड
चंद्रपूर, दि. 27 : काँग्रेसच्यावतीने आमदार प्रतिभा धानोरकर यांनी बुधवारी (ता. 27) उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना धानोरकर यांच्या सोबत धनोजे कुणबी समाजातील महत्वाचे नेते हे अनुपस्थित होते. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत धनोजे कुणबी समाजाने बाळू धानोरकर यांना एकसंघ होत साथ दिली. धानोरकर यांच्या विजयात धनोजे कुणबी समाजाचा मोठा वाटा होता. त्या धनोजे कुणबी समाजासाठी कोणतेही सहकार्य धानोरकर कुटुंबाने केलेले नाही त्यामुळे.प्रतिभा धानोरकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना धनोजे कुणबी समाजातील नेत्यांनी पाठ दाखवली आहे.
धनोजे कुणबी समाजाची कामे होती, त्यांचे प्रश्न सुटतील या आशेने समाजाने बाळू धानोरकर यांना विजयी केले होते. मात्र समाजाचे कोणतेही प्रश्न सुटलेले नाही. धानोरकर यांच्यानंतरही धनोजे कुणबी समाजाकडे कुणी लक्ष दिले नाही. काँग्रेसमध्ये चंद्रपुरात घराणेशाही सुरू आहे. बाळू धानोरकर हे खासदार होते. त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना आमदार करण्यात आले. धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर हे भद्रावतीचे नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या या घराणेशाहीला आता धनोजे कुणबी समाजाकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
धानोरकर कुटुंबाकडून मिळालेल्या अशा वागणुकीमुळे धनोजे कुणबी समाज प्रचंड नाराज झाला आहे. धनोजे समाजाचे मध्यवर्ती अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते ,माजी अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मनोहर पाऊणकर, धनोजे कुणबी समाजाचे राजुरा कमिटीचे अध्यक्ष दौलतराव भोंगळे, बल्लारपूरचे डॉ. जरीले, वणीतील समाजाचे अध्यक्ष राजेश पहापडे, राजुराचे देवाळकर, कोरपनाचे अध्यक्ष सुनील देरकर , महायुतीमधील राष्ट्रवादीत असलेले मोरेश्वर टेंभुर्डे यांचे चिरंजीव जयंत टेंभुर्डे यांच्यासह धनोजे कुणबी समाजाचे जिल्ह्यातील आणि तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.