
मुंबई : उद्धव ठाकरे गटाला शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला आणखी एक धक्का बसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे या नॉट रिचेबल झाल्या असून त्या सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आमदार कायंदे यांच्यासोबत ठाकरे गटाचे मुंबईतील तीन माजी नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या नेत्या म्हणून मनिष कायंदे यांची ओळख आहे. त्यांना मुंबई मनपात राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. आज मुंबईत ठाकरे गटाकडून महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, मनिषा कायंदे या शिबिराकडे फिरकल्याच नाहीत. त्यांचा फोनही नॉट रिचेबल लागत असल्याने चर्चा सुरु झाल्या. अखेर मनिषा कायंदे या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कोण आहेत कायंदे?
मनीषा कायंदे या पूर्वी भाजपमध्ये होत्या. भाजपकडून 2009 ला सायन कोळीवाड्यातून निवडणूक लढल्या होत्या. त्यानंतर 2012 साली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. 2018 साली उद्धव ठाकरे यांनी त्यांना विधानपरिषदेवर जाण्याची संधी दिली.