

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील भटउमरा या वारकरी परंपरेने समृद्ध असलेल्या गावात एक अनोखी घटना घडली. गावकऱ्यांच्या लाडक्या वळूच्या निधनानंतर माणसांप्रमाणे त्याच्या मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतर तेरवीचा विधी पार पडला.
तेरवीच्या दिवशी गावातील बैलांना गोड नैवेद्य खाऊ घालण्यात आले. गावकऱ्यांसाठी सामुदायिक भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली. याशिवाय, शेतकरी बांधवांचा शेला-टोपी देऊन सन्मान करण्यात आला. गावकऱ्यांच्या मते, वारकरी संप्रदायाच्या संस्कारांमुळे पिढ्यानपिढ्या ही परंपरा जपली जात आहे.
भटउमरा गावात बैल हा केवळ शेतातील कामासाठी नसतो, तर कुटुंबाचा भाग मानला जातो. त्याच्या निधनानंतरही त्याला सन्मान देण्याची परंपरा आहे. “बैल आमच्या शेतीचा आणि कुटुंबाचा आधार आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्यानंतरही सन्मान दिला जातो,” असे गावकरी अभिमान काळे यांनी सांगितले.
या प्रसंगी गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन अंत्यविधी आणि सामुदायिक भोजनात सहभागी झाले. ही परंपरा गावातील एकतेचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. शेतकरी, बैल, आणि गावकरी यांच्यातील स्नेहाचे हे उदाहरण इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
भटउमरा गावाची ही प्रथा इतर गावांसाठीही आदर्श ठरू शकते. शेती आणि पशुधन यांचे महत्त्व ओळखून ग्रामीण भागातील जीवनशैलीचा अभिमान वाढवण्याचे काम ही घटना निश्चितच करते.