
मुंबई- मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपुर्ण बैठक पार पडणार आहे. दुपारी ४ वाजता ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार आहे. या बैठकीसाठी मनोज जरांगे यांना पत्र पाठवण्यात आले असले तरी आपण या बैठकीला जाणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज राज्य सरकार दिवसभर सल्लामसलत करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी दिली. या बैठकीला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह त्यांचे मंत्रिमंडळ व सर्वच बडे अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पण मी या बैठकीला हजर राहणार नाही, असे ते म्हणालेत. (Maratha Reservation Issue)
जरांगे यांनी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. येत्या २० जानेवारीपर्यंत आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा आझाद मैदानावर आमरण उपोषण करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. अशातच, जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या वतीने हालचालींना वेग आला आहे.