

– देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
नागपूर (Nagpur): केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांना मोठा आर्थिक लाभ होणार असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतमालाला अधिक भाव मिळावा यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांनी सांगितले की, कच्च्या तेलावर यापूर्वी कोणतेही आयात शुल्क नव्हते. मात्र, आता २०% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, रिफाईन तेलावरील आयात शुल्क १२.३०% वरून ३२.३०% करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार असून, बाजारात सोयाबीनच्या किमती वाढण्यास मदत होईल. सोयाबीन खरेदीबाबतही सरकारने निर्णय घेतला असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
कांदा प्रश्नाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने कांद्याच्या किमान निर्यात किंमतीत (Minimum Export Price) कपात केली आहे, ज्यामुळे कांदा, कापूस, सोयाबीन, आणि बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. या निर्णयांबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.
एकनाथ खडसे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर, फडणवीस म्हणाले की, “त्यांनी काय म्हटले ते मला माहीत नाही, परंतु त्यांच्या संदर्भात केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय सर्वांना मान्य आहे. गणेशोत्सवानंतर या संदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल.”