
सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निर्देश
वर्धा : शहरातील हिंगणघाट-यवतमाळ व रेल्वे लाईनच्या पलीकडील भागाला वर्धा शहराशी जोडणाऱ्या आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाला सन 2013 मध्ये मंजूरी दिली गेली. एका प्रदिर्घ तपानंतर मोठया प्रयत्नाने या उड्डाण पुलाचे काम 12 वर्षानंतर सन 2025 मध्ये पुर्ण झाले. या उड्डाण पुलाच्या कामासाठी लोकप्रतिनीधी तसेच सर्वसामान्य जनतेकडून सतत पाठपुरावा केला जात होता. पुलाचे काम झाल्यानंतर बरेच दिवस हा पुल लोकार्पणाच्या प्रतिक्षेत होता. परंतु या पुलावरुन सकाळी व सायंकाळच्या वेळेस होत असलेली वाहतुकीची कोंडी व त्यामुळे लोकांना होणारा मनस्ताप यामुळे अनेक नागरीकांकडून पुलावरुन वाहतुक सुरु करण्याबाबत सतत दबाव निर्माण होत होता. याबाबत खासदार अमर काळे यांनी सुध्दा पुल तात्काळ वाहतुकीकरीता सुरु करण्याबाबत अनेकदा अधिकाऱ्यांकडे तगादा लावला. शेवटी त्यांनी या पुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला मी हजर राहणार नाही पण एखादया सर्वसामान्य नागरीकाच्या हाताने यापुलाचे लोकार्पण करण्यात यावे व पुल वाहतुकीकरीता सुरु करण्यात यावा असे वक्तव्य त्यांनी पुलावर भेट दिली असता केले.
त्यावेळी त्यांना अनेक लोकांनी या पुलावरुन वाहतुक केव्हा सुरु होणार ! पुल बांधून तयार असतांनाही वाट कशाची पाहता असे एक ना अनेक प्रश्न त्यांना नागरीकांनी केले. त्यावेळी त्यांनी वरील घोषणा केली. त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाची झोप उघडता उघडेना. अखेर गणपती विसर्जनाच्या वेळी पुलावर होणारी वाहतुक कोंडी व लोकांना होणारा त्रास याची दखल घेऊन या जिल्हयाचे माजी खासदार दत्ताजी मेघे यांनी गणपती विसर्जनाचे वेळी नारळ फोडून या पुलावरुन गणपतीच्या मिरवणुकीने शुभारंभ करुन हा पूल वाहतुकीकरीता खुला करुन दिला.
या गोष्टीला जवळपास चार महिन्यांचा कालावधी झाला. पुलावर अद्यापही लाईट लागले गेले नाही. त्यामुळे पुलावर रात्रीचे वेळी पूर्णतः अंधाराचे साम्राज्य असते. या अंधाराचा फायदा घेऊन समाजातील काही टवाळखोरांकडून स्त्रीयांना अडविण्याचे प्रकार सुध्दा घडले होते अशी लोकांकडून माहीती प्राप्त झाल्यानंतर खासदार श्री. अमर काळे यांनी तात्काळ सा.बां. विभागाला पत्र लिहीले व दुरध्वनीवरुन सुध्दा संपर्क साधला व पुलावरील पथदिवे तीन दिवसांचे आत सुरु करावे असे निर्देश दिले.


















