

पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकारी अभियंत्यांना निर्देश
चंद्रपूर (Chandrapur) दि. 9 :- असोलामेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून येणारी चिचाळा ते हळदी दरम्यान नळजोडणी पाईपलाईन फुटल्यामुळे येथील शेतक-यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब शेतक-यांनी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून देताच सदर नळजोडणी पाईपलाईन त्वरीत दुरुस्त करण्याचे निर्देश वने व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी असोलामेंढा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
चांदा ते बांदा या प्रकल्पांतर्गत पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नांतून असोलामेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून नळजोडणीमार्फत मुल तालुक्यातील गावातील शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांच्याकडे राज्याच्या अर्थखात्याची जबाबदारी असताना ही योजना मंजूर झाली होती, हे विशेष.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चांदा ते बांदा विशेष कार्यक्रमांतर्गत मुल तालुक्यातील चिचाळा व नजिकच्या गावांसाठी असोलामेंढा कालव्यातून नळजोडणी पाईपलाईन टाकण्यात आली. चिचाळा,ताडाळा, हळदी, दहेगाव मानकापूर गावांना शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्यासाठी 23 कोटी 47 लक्ष 54 हजार खर्च करण्यात आले. ही पाईपलाईन चिचाळा हळदी दरम्यान फुटल्यामुळे सिंचनाचे पाणी उपलब्ध होत नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली. ही बाब ना. श्री. मुनगंटीवार यांना कळताच त्यांनी असोलामेंढा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अशोक पिदुरकर यांना सिंचनाची नळजोडणी पाईपलाईन तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले.