कर्तव्याने वागलो तर हे जगणे सोपे होते !

0

निसर्ग आणि त्याने घालून दिलेली ”लाईफ सायकल ” जर आपण सगळ्यांनी काटेकोरपणे पाळली तर कुठेही समस्या निर्माण होणार नाहीत मात्र आपण नियम किंवा कर्तव्याने वागत नाही म्हणून बहुतांश समस्या निर्माण होतात असे गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यासकांच्या लक्षात आले आहे. अनेकदा आपण काहीही केले नाही तरी चालते मात्र आपण काहीतरी कृती करतो नेमकी तीच निसर्गाच्या मुळावर येत असते त्यातून निसर्गाला मदत तर दूरच उलट आपण निसर्गाचे कर्दनकाळ म्हणून पुढे येत असतो. समाजात काही व्यक्ती अश्या असतात की ते स्वतः काहीच करीत नाहीत अन इतरांना सुद्धा काही करू देत नाहीत ,अश्यावेळी कुणीतरी वडीलधारी व्यक्ती तिला सांगते की बाबा रे तू काहीही केले नाही तरी चालेल पण कुठेही लक्ष तरी घालू नको , नको ते उपद्व्याप करून आम्हाला अडचणीत अनु नको. अनेकांचे असेच असते. काहीतरी करण्याच्या नावाखाली हे लोक नसत्या उचापती करून ठेवतात.

आपल्या सभोवताल खूप गोष्टी अगदी सोप्या असतात आपण त्यांना उगाच कठीण आणि अवघड करून ठेवत असतो. दरवर्षी तपणारा उन्हाळा आणि त्रासदायक होणारी ग्लोबल वार्मिंगची समस्या मानवाला भेडसावत आहे त्यासाठी झाडे लावा अश्या मोहीम सरकार,आणि स्वयंसेवी संस्था हातात घेत असतात ,त्यावर कोट्यवधी रुपये खर्च होतात. सहभागी माणूस चुकून एखादे झाड लावतो आणि नित्याच्या वागण्यात असंख्य झाडांची कत्तल करीत असतो असे अनेकदा जाणवते. निसर्गाने स्वतःच्या निर्माण आणि संगोपनाची सुंदर व्यवस्था निर्माण केलेली असते आपण त्यात हस्तक्षेप करतो आणि रंगाचा बेरंग होतो. आपल्या सभोवताल तुम्ही एकही झाड लावले नाही तरी चालेल कारण ती आपोआप उगवत असतात तुम्ही फक्त एवढे करा की तुमच्या हातून एकही झाड उपटले किंवा तोडले जाऊ नये. कोणत्याही अपरिहार्य कारणाने झाड तोडावेच लागत असेल तर त्या बदल्यात किमान १० झाडे लावा आणि जगवून दाखवा.

आपण अनेकदा निसर्गप्रेमी म्हणून मिरवत असतो . अनेकदा नद्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतो , त्याचा भलामोठा इव्हेन्ट साजरा केला जातो आणि उद्देश सफल झाला की त्या नदीचे पुन्हा डबके तयार होते आपण हळूच दुसऱ्या कामात व्यस्त झालेले असतो. मुळात असे करण्याची गरज नाही. तुम्ही कुठल्याही नदीला स्वच्छ करण्याची गरज नाही ,ती मुळातच प्रवाही असते फक्त नागरिक म्हणून तुम्ही तुमच्या कर्तव्याला जागा आणि तिच्या प्रवाहात घाण करू नका. कचरा,घाण पाणी,निर्माल्य,एवढेच काय मेलेली जनावरे सुद्धा नदीत फेकताना कुणालाही अपराधीपणाची जाणीव होऊ नये असे आपण सगळे वागत असतो. नदीला स्वच्छ करू नका फक्त तिला घाण करणार नाही याची काळजी घ्या नदी आपोआप स्वच्छ होऊन पुन्हा प्रवाही होऊन वाहायला लागेल. निसर्गाने हा इशारा मानवाला नेहमी दिला असतो की तुम्ही काहीही करू नका फक्त स्वतःची पाली सोडू नका.

काही लोक उगाच जगाचे शांतिदूत म्हणून फिरत असतात. प्रत्येक शहरात सुद्धा असे कथित शांतिदूत असतात , काहींनी तर त्याच विषयाला आयुष्य वाहून घेतलेले असते. समाजात शांतता आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे असते मात्र त्यांना हे समजावून सांगण्याची गरज आहे की समाज हा नेहमी शांतच असतो तुम्ही फक्त द्वेष पसरणार नाही याची काळजी घ्या. मात्र तसे होताना दिसत नाही. अहोरात्र द्वेष प्रसार करणारे घटक आजकाल पोलिसांच्या शांतता समितीचे बिल्लाधारी सदस्य बनलेले असतात आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीला सर्वात पुढची खुर्ची घेऊन बसलेले दिसतात. समाजाचे मूळ शांतता आहेच फक्त तुम्ही कुणाचेही मन दुखावणार नाही अशी भाषा वापरू नका , जे स्वतःला आवडणार नाही असे वर्तन इतरांच्या बाबतीत करू नका.

सरकार शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचा नेहमी आभास निर्माण करीत असते मात्र जो जगाला पोसतो त्याचा कुणाला कैवारी होण्याची गरज नाही तो समर्थ आहे फक्त सरकारने त्याच्या जीवनातअनावश्यक हस्तक्षेप करणे सोडावे मग बघा तो स्वतःसह जगाला कसा संरक्षित ठेवतो. शेतमालाला सुद्धा योग्य भाव मिळतो फक्त सरकारी हस्तक्षेप थांबायला हवा. त्यासोबतच कुणी प्राण्यांचे संरक्षक होण्याचीही गरज नाही तुम्ही एवढेच करा की प्राणी मारू नका ,हिरवीगार जंगले मूठभर स्वार्थापायी जाळू नका. कुणी समाजाला जगणे शिकवायला निघाला आहे तर कुणी भक्ती सांगायला निघाला आहे ,मुळात जगात लाखो वर्ष जे आहे ते अगदी जागेवर आहे , त्याला आणखी काही शिकविण्याची गरज नाही फक्त शिकविण्याची धडपड करणार्यांनी स्वतःला व्यवस्थित करायला हवे कारण अनेक व्यक्तींचा समाज बनतो. एक व्यक्ती सुधारली तर कदाचित देश आणि समाज सुधारेल.

-पुरुषोत्तम आवारे पाटील
संवाद -9892162248