वेल अमृताची असेल तर फळही अमृताचे

0

रोहिणी परांजपे यांचे प्रतिपादन
श्रीचैतन्य पीठाचा वर्धापन दिन
नागपूर (Nagpur), 11 नोव्हेंबर
संत-सत्पुरुषांचा स्पर्श जीवनाला झाला तर जीवन सार्थक होते. संतांच्या सहवासातील दिवाळी ही खरी मानायची. तुकाराम महाराज सांगतात, जसं बीज पेरलं, तसंच रोप उगवतं. त्याप्रमाणे जीवनाला दिशा मिळते. वेल अमृताची असली की फळ अमृताचं येतं, असं तुकोबारायांनी सांगितल्याचे प्रसिद्ध कीर्तनकार रोहिणी परांजपे म्हणाल्या.
शिवाजीनगर येथील शिवाजी सभागृहात अखिल भारतीय त्रिपदी परिवार आणि श्री शांतिपुरुष सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या श्रीचैतन्य पीठाचा वर्धापन दिन, तसेच बाबामहाराज तराणेकर यांच्या अभीष्ट चिंतन सोहळ्याच्या दुसर्‍या दिवशी सोमवारी झालेल्या कीर्तनात त्या बोलत होत्या.

संध्याकाळी त्रिपदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंत्रोच्चारात बाबामहाराज आणि विशेष अतिथी इंदोर मध्यप्रदेशचे नगरविकास व संसदीय कार्यमंत्री कैलास विजयवर्गीय यांचे आगमन झाले. व्यासपीठावर बाबा महाराज तराणेकर, कैलास विजयवर्गीय आणि राजीव हिंगवे उपस्थित होते.
निरुपणाला त्यांनी ‘अमृताची फळे, अमृताची वेली’ हे तुकाराम महाराजांचे भजन घेतले. हा चार चरणांचा अभंग संतांनी दोन चरणांकरिता दिला. व्यावहारिक जगात मनुष्य कितीही धावत असला तरी आयुष्याचा पाया हा आध्यात्मिक असला तर अनेक समस्या आपोआप सुटतात. मानसिक शांततेसाठी बाहेर डोकावण्यापेक्षा संतसाहित्यात ती मिळते. सर्व संतांनी मानवी जीवनाला अमृततत्वाचा स्पर्श व्हावा याकरिता ग्रंथ तर दिलेच पण जीवन जगण्यासाठी भक्तीचा सुंदर मार्ग दाखविला आहे, असे रोहिणीताईंनी सांगितले.
यावेळी बाबामहाराज यांनी, गेल्या 24 वर्षांपासून नाना महाराज संस्थानशी जुळलेल्या कैलासजींचं इंदोरच्या विकासात मोठे योगदान असल्याची माहिती दिली. राजीव हिंगवे यांनी कैलास विजयवर्गीय यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले.
यावेळी कैलास विजयवर्गीय यांच्या हस्ते बाबामहाराजांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कीर्तनक्षेत्रातील ज्येष्ठ-श्रेष्ठ कीर्तनकार मुकुंदबुवा देवरस उपस्थित होते.

बाबामहाराजांसारख्या दिव्य विभूतीचा सहवास मला लाभला हे माझे भाग्य. भारत ही पुण्यभूमी आहे. आजही येथे पवित्रता, दिव्यता आहे. आपण सर्व भारतवासी आहोत हे आपले सौभाग्य आहे. महाराष्ट्रात गोमातेला राजमाता घोषित केले आहे, याचा मला गर्व आहे. कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नये असे आपल्या संविधानात आहे. पण तरीही अनेक लोक गोहत्या करतात. लहानपणी नानामहाराजांच्या प्रवचनांचा अनुभव घेतला. जीवनाला योग्य दिशा देणारे महान संत बाबामहाराज यांचा आशीर्वाद लाभल्याने मी धन्य झालो, असे विचार यावेळी कैलास विजयवर्गीय व्यक्त केले.

चैतन्य पीठाच्या वर्धापन दिनाचा उद्या मंगळवार रोजी समारोप आहे. यावेळी देवनाथ मठाचे पीठाधिश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांच्या उपस्थितीत बाबामहाराज तराणेकर यांचा अभीष्टचिंतन सोहळा होणार आहे. कार्यक्रमाला सानंद न्यासचे जयंत भिसे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.