

अमरावती : शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची तलवार लटकत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पदावरून हटवल्यास त्याचे गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी (MLA Bacchu Kadu) दिला आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना कडू यांनी हा इशारा दिला.
भाजपला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, कारण एकनाथ शिंदे यांचे देखील 5 ते 10 टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास तुमच्या योजना कामी येणार नाहीत, असे कडू म्हणाले. सरकारने एकदा आरक्षणाचा मुद्दा संपवायला पाहिजे. आरक्षण विषय हा राजकीय लोकांनी केलेली जातीय व्यवस्था आहे. कारण ते विकासावर मते घेऊ शकले नाही. आता निवडणुकीत समाजाच्या आरक्षणावर आणि जातीचे मुद्दे घेऊन मते मागितली जाणार असल्याचे ते म्हणाले. एकीकडे लोक आरक्षण मागत आहेत तर दुसरीकडे कंत्राटी नोकर भरती केली जातेय, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.