‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की….. !

0

मुंबई (Mumbai) :महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना आज मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीचा सोहळा हा अतिशय भव्यदिव्य असा ठरला. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 22 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी मोठ्या थाटात पार पडला. राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वत: उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला तब्बल 22 राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात संत-महंतांनी देखील हजेरी लावली. त्यांनी महाराष्ट्राच्या या नव्या सरकारला आशीर्वाद दिले. तसेच क्रिकेट, सिनेक्षेत्रापासून विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करुन आपला ठसा उमटवणाऱ्या दिग्गजांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं. त्यामुळे अशा शेकडो दिग्गज व्यक्तीमत्त्वांनी या भव्य कार्यक्रमाला हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा ‘देवेंद्र’पर्वाला सुरुवात झाली आहे.

या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी विशेष आसनव्यवस्था निश्चित करण्यात आली होती. या पहिल्या रांगेत फडणवीस कुटुंबिय आणि अंबानी कुटुंबिय बसले होते. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. २०१४ साली फडणवीसांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा भव्यदिव्य सोहळा पार पडला होता. २०१४ ते २०१९ सलग ५ वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले होते. हा सोहळा बघण्यासाठी राज्यभरातील ४० हजार कार्यकर्ते दाखल झाले होते. नागपूर शहरातून देखील मोठ्या संख्येने देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक देखील मुंबईत दाखल झाले होते.