

टेक नेक्स्टचे ‘हीलिंग रीइन्व्हेंटेड’ विषयावर सत्र संपन्न
नागपूर(Nagpur): कैलास मानसरोवर यात्रेसारख्या अतिउच्च उंचीवरील यात्रांसाठी हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी एक महत्त्वाची आधार प्रणाली म्हणून उपयुक्त आहे असे बजाज लाईफ केअरचे संचालक सुनील बजाज यांनी सांगितले. उंचावर अनेकांना वातावरणात ऑक्सिजनच्या कमतरतेचा त्रास होतो. अश्यावेळी कृत्रिम पद्धतीने शरीराला ऑक्सीजन पुरवठा करणे महत्वाचे ठरते. टेक नेक्स्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या “हीलिंग रीइन्व्हेंटेड: द टेक बिहाइंड हायपरबेरिक चेंबर्स” या सत्रात बोलताना, त्यांनी आव्हानात्मक परिस्थितीत पोर्टेबल हायपरबेरिक चेंबर्सच्या जीवनरक्षक भूमिकेकडे लक्ष वेधले.
“हे हलके चेंबर्स, एका लहान बॉक्स सारखे दिसतात, ते दुर्गम आणि कमी ऑक्सिजन असलेल्या वातावरणात ऑक्सिजन थेरपी प्रदान करण्यासाठी तयार केलेले आहेत. या चेंबर मध्ये व्यक्तीला झोपवून सुमारे 2 पीएसआय (पाउंड प्रति चौरस इंच) एअर प्रेशर तयार केले जाते. जेणेकरून फुफ्फुसांना अधिक ऑक्सिजन शोषण्यास मदत होते,” नंतर हा ऑक्सिजन रक्तप्रवाहातून अधिक कार्यक्षमतेने फिरतो, श्वास घेण्यास त्रास होण्यापासून आराम मिळतो आणि जखम झाली असल्यास जलद बरे होण्यास मदत करतो.” असे बजाज यांनी सांगितले.
सत्रात हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, बॅटरी-चालित पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, पोर्टेबल ऑक्सिजन किट कसे कार्य करतात आणि त्याचा वैद्यकीय उपयोग कसा करता येतो यावर त्यांनी प्रकाश टाकला. या सत्राचे सूत्रसंचालन महेंद्र गिरधर यांनी केले.