कल्याण : २६ वर्षीय पतीचे युक्रेनमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध व तिला न सांगता पती गुपचूप युक्रेनला पळाल्याचा धक्का सहन न झाल्याने पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार कल्याण परिसरात उघडकीस आला. या प्रकरणी युक्रेनमधून परतलेल्या आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. नितीश नायर असे अटक झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
मृत महिलेच्या वडिलांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली होती. आरोपी नितीशशी २०२० मध्ये त्यांच्या मुलीचा विवाह झाला होता.
दोन वर्ष सुखाने संसार सुरू असतानाच सप्टेंबर महिन्यात मुलीला तिचा पती नितीशचे युक्रेनमधील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. तिच्या पतीचे त्या महिलेसोबतचे काही फोटोही तिला मोबाईलमध्ये दिसल्याने संशय अधिकच बळावला होता. त्यामुळे दोघांमध्ये खटके उडू लागले. दरम्यान, ८ नोव्हेंबरला नितीश आपल्या पत्नीला बीकेसी येथील त्याच्या कार्यालयात जात असल्याचे सांगत युक्रेनला गेला. तेथून त्याने पत्नीला मेसेज करुन मी युक्रेनला पोहोचलो असून मी परत येणार नसल्याचे सांगितले. यामुळे पत्नी नैराश्यात गेली होती व १० नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या तोंडावरच तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने काही मित्रांना मेसेज करून आत्महत्या करणार असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. शिवाय तरुणीने तिच्या आईला पतीकडून होणाऱ्या छळाची माहिती दिली होती. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, गुरुवारी तिचा पती नितीश मायदेशी परतला आणि याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला राहत्या घरातून अटक केली.
















