

शाळांना पोहोचल्या अपु-या प्रश्नपत्रिका
नागपूर (Nagpur), 7 एप्रिल
राज्य शासनाद्वारे सरकारी, खाजी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी 8 ते 25 एप्रिल या कालावधीत ‘पॅट’ ची परीक्षा होत आहे. मंगळवार, 8 एप्रिल रोजी वर्ग 7 ते 9 च्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा होत आहे. परंतु, नागपूर जिल्ह्यातील शाळांना अपु-या प्रश्नपत्रिका पोहोचल्यामुळे या परीक्षा कशा घ्याव्या, असा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला पडलेला आहे.
‘पॅट’परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) शाळांना पुरविल्या जातात. पण शाळांची पटसंख्या न बघता एनससीईआरटीने या प्रश्नपत्रिका पाठवल्या आहेत; अनेक शाळांना पटसंख्येच्या तुलनेत अर्ध्याच प्रश्नपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. एससीईआरटीने शाळांना प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना पुरविण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु, एक प्रश्नपत्रिका सुमारे सात पानांची असून शेकडोच्या संख्येने त्यांची झेरॉक्स करण्यात वेळ आणि पैसाही जाणार आहे.
एससीईआरटीने वेळेत उर्वरित प्रश्नपत्रिका न पाठवल्यास शाळांना परीक्षा घेता येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थ महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.